कांदा परवडत नसेल तर खाऊ नका! : सदाभाऊ खोत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2019 01:57 AM2019-11-02T01:57:36+5:302019-11-02T01:58:03+5:30
कांद्याचा प्रश्न राज्यात आणि देशात ज्वलंत झालेला आहे. माझा नेहमीचा प्रश्न आहे, कांदा परवडत नसेल तर तो खाऊ नका त्यामुळे काही फरक पडत नाही. किमान माझ्या शेतकऱ्याला दोन पैसे तरी मिळतील.
लासलगाव/निफाड : कांद्याचा प्रश्न राज्यात आणि देशात ज्वलंत झालेला आहे. माझा नेहमीचा प्रश्न आहे, कांदा परवडत नसेल तर तो खाऊ नका त्यामुळे काही फरक पडत नाही. किमान माझ्या शेतकऱ्याला दोन पैसे तरी मिळतील. कांदा ५०-६० रु पये किलो झाला की, लगेच ओरड सुरु होते. हे कोठेतरी थांबायला हवे. जर कांदा खायचाच असेल तर स्वत: शेत घ्या, नींदणी करा, तेव्हाच शेतकºयाचे दु:ख कळेल, असे मत कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केले.
परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणीप्रसंगी निफाड तालुक्यातील कोळवाडी (श्रीरामनगर) येथे ते बोलत होते. खोत पुढे म्हणाले, ‘परतीच्या पावसाने यंदा कांद्याचे मोठे नुकसान होणार आहे. परिणामी कांद्याचे दर वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा परिस्थितीत कांदा ५०-६० रु पये किलो दराने खावा लागला, तर खाल्ला पाहिजे. कांदा हा काही अणुबॉम्ब नाही. शेतकरी ३-४ महिन्यात लागेल तितका कांदा पिकवू शकतो. यंदा अतिपावसाने कांद्याचे उत्पादन घटणार आहे. कांदा लागवड क्षेत्रही कमी होणार आहे. अशा परिस्थितीत बाजारपेठेची कांद्याची मागणी लक्षात घेऊन पुरवठा करण्याचे धोरण शासनातर्फेराबवले जाईल, असे सांगून सरकार शेतकरी हिताचे निर्णय घेईल, असे आश्वासन खोत यांनी दिले. कांद्याचे भाव अनेकदा अस्थिर होतात. त्यावेळी देशभरात फक्त कांद्याची चर्चा केली जाते. त्यासाठी कांदा आयात-निर्यातीचे किमान पाच वर्षांचे कायमस्वरूपी धोरण आखणे गरजेचे आहे. भविष्यात शेतकऱ्यांना फायदा करून द्यायचा असेल, तर कांदा निर्यातीचा निर्णय केंद्र
सरकारला घ्यावा लागेल, असेही खोत म्हणाले.
श्रीरामनगर येथे ढगफुटी व गारपीट होऊन द्राक्षबागा व मका पिकाचे नुकसान झाले. या क्षेत्राची पाहणी त्यांनी केली. शनिवारी मदत व पुनर्वसन समितीची मंत्रालयात बैठक होत आहे. या बैठकीत अहवाल मांडणार असल्याचे खोत म्हणाले. श्रीरामनगर येथील कोंडाजी शिंदे यांच्या द्राक्षबागेचे व मका पिकाचेही नुकसान झाले. या बागेला खोत यांनी भेट देऊन पाहणी केली. याप्रसंगी भीमराज काळे, संपत खताळे, रावसाहेब गोळे, रवींद्र शिंदे यांनी समस्यांचा पाढा वाचला.