शस्त्रागारात ‘त्या’ पोलिस पित्याने पिस्तुल जमा केले असते तर...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2019 04:34 PM2019-06-23T16:34:19+5:302019-06-23T16:36:33+5:30
ड्यूटीवर असताना शस्त्रागार कक्षातून संबंधित पोलिसांना दिले जाणारे शस्त्र ड्यूटी संपताच पुन्हा जमा करणे बंधनकारक आहे; मात्र पोलिस आयुक्तालयातील काही कर्मचारी शस्त्र शस्त्रागार कक्षात जमा न करता थेट घरी घेऊन जात असल्याचा धक्कादायक प्रकार शुक्र वारी घडलेल्या या घटनेने समोर आला आहे.
संदीप झिरवाळ, नाशिक : कौटुंबिक वादातून आलेल्या रागाच्या भरात पोलीस नाईक संजय भोये याने आपल्या मुलांवर गोळ्या झाडून ठार मारल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी घडली. भोये यांनी ड्यूटी संपल्यानंतर उपनगर पोलीस ठाण्यातील शस्त्रागारात सर्व्हीस रिव्हॉल्वर जमा केली असती तर कदाचित गोळीबाराची घटना हाणामारीवर निभावली असती, अशी चर्चा पोलीस वर्तुळात रंगली आहे.
पेठरोडवरील अश्वमेधनगरच्या राजमंदिर सोसायटीत झालेल्या गोळीबाराच्या घटनेने संपूर्ण शहरच हादरले. त्याला कारणही तसेच होते, पोलीस पिता असलेल्या भोये यांनी कौटुंबिक वादातून दोघा मुलांवर पिस्तूल रोखून चार फैरी झाडल्या होत्या. एकाच्या डोक्यात तर दुसऱ्याच्या छातीत गोळी लागल्याने अतिरक्तस्त्राव होऊन सोनू चिखलकर याचा घटनास्थळी तर शुभमचा रु ग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. उपनगर पोलीस ठाण्यात बीट-मार्शल म्हणून क र्तव्य बजावणारे भोये यांना पोलीस ठाण्यातून त्यांच्या नावावर पिस्तुलसह ३० जिवंत काडतूस देण्यात आलेले होते. नियमानुसार ड्युटी संपल्यावेळी संबंधित पोलिस कर्मचाऱ्यांनी पोलिस ठाण्यातून दिलेले शस्त्रे, रायफल असो की रिव्हॉल्व्हर लागलीच शस्त्रगार कक्षात जमा करणे बंधनकारक असते. एवढेच काय तर एखादा पोलिस अधिकारी जर रजेवर जाणार असला तरी त्याला नियमाने पिस्तुल बाळगता येत नाही. गुरूवारच्या दिवशी साप्ताहिक सुट्टी असूनही भोये यांनी पिस्तुल व काडतुसे हे सोबत बाळगली. दरम्यान, कौटुंबिक वादातून त्यांचा राग अनावर झाला आणि थेट पिस्तूल काढून आपल्या सावत्र मुलांवर गोळीबार केला. ड्यूटीवर असताना शस्त्रागार कक्षातून संबंधित पोलिसांना दिले जाणारे शस्त्र ड्यूटी संपताच पुन्हा जमा करणे बंधनकारक आहे; मात्र पोलिस आयुक्तालयातील काही कर्मचारी शस्त्र शस्त्रागार कक्षात जमा न करता थेट घरी घेऊन जात असल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी घडलेल्या या घटनेने समोर आला आहे.