राणे सांगत असतील तर त्यात तथ्य असेल महाजन : न्यायालयीन चौकशीनंतर सत्य बाहेर येईल
By संकेत शुक्ला | Updated: March 23, 2025 20:56 IST2025-03-23T20:55:59+5:302025-03-23T20:56:27+5:30
सिंहस्थ कुंभमेळा आढावा बैठकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवारी (दि. २३) नााशिकध्ये आले असता त्यांच्या स्वागतासाठी गिरीश महाजन उपस्थित होते.

राणे सांगत असतील तर त्यात तथ्य असेल महाजन : न्यायालयीन चौकशीनंतर सत्य बाहेर येईल
संकेत शुक्ल
नाशिक : सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणी तपास योग्य दिशेने सुरू आहे. सुशांतसिंहने आत्महत्या केली की, त्याची हत्या करण्यात आली, हे चौकशीअंतीच स्पष्ट होईल, ठाकरे यांच्या दूरध्वनीबद्दल नारायण राणे सांगत असतील, तर त्यात तथ्य असेल, असा दावा आपत्ती व्यवस्थापन तथा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केला.
सिंहस्थ कुंभमेळा आढावा बैठकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवारी (दि. २३) नााशिकध्ये आले असता त्यांच्या स्वागतासाठी गिरीश महाजन उपस्थित होते. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केले.
मंत्री महाजन म्हणाले की, उध्दव ठाकरेंनी आदित्य ठाकरेंना वाचविण्यासाठी नारायण राणे यांना फोन केला होता, असा गौप्यस्फोट नारायण राणे यांनी माध्यमांद्वारे केला. नारायण राणे हे वरिष्ठ नेते असून, ते सांगत असतील तर त्यात तथ्य असेल. चौकशीअंती सर्व स्पष्ट होईल, नियमाप्रमाणे सगळे बाहेर येईल, असा दावा मंत्री महाजन यांनी केला आहेे. सिंहस्थ कुंभमेळ्याचे काम युध्दपातळीवर सुरू असून, पुढील आठवड्यात पुन्हा बैठक घेण्यात येईल. असे त्यांनी स्पष्ट केले.
नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा यशस्वी करणे आपल्यासाठी आव्हान आहे, प्रयागराज येथील कुंभमेळ्यासाठी अपेक्षेपेक्षा जास्त भाविकांनी उपस्थिती लावली. त्यामुळे नाशिक कुंभसाठी येणाऱ्या भाविकांचा अंदाज घेत सुक्ष्म नियोजन करण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी मुख्यमंत्री दर दहा ते पंधरा दिवसांनी नाशिक दौरा करणार आहेत, मीदेखील अधिवेशन संपल्यानंतर नाशिक दौरा करत सिंहस्थ तयारीचा आढाव घेणार असल्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले.
महाजन यांच्यासाठी फडणवीस थांबले
शासकीय विश्रामगृह येथे मुख्यमंत्री फडणवीस कुंभमेळ्यासंदर्भातील आढावा बैठक घेणार होते. त्या बैठकीसाठी महाजन उपस्थित होते. त्यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना मुख्यमंत्री फडणवीस त्यांची वाट पाहात थांबले होते. हे समजल्यानंतर गिरीश महाजन यांनी अक्षरश: धावतच मुख्यमंत्र्यांना गाठले, त्यांच्या या कृतीची चांगलीच चर्चा रंगली.