‘स्वाइन फ्लू’ने मृत्यू झाल्यास डॉक्टरांवर गुन्हे दाखल करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2019 01:24 AM2019-03-30T01:24:16+5:302019-03-30T01:24:49+5:30
शहरात स्वाइन फ्लूचा संसर्ग वाढत असून, आत्तापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाला असल्याने महापालिकेच्या आरोग्य विभागाने खासगी वैद्यकीय व्यावसायिकांना तंबी दिली
नाशिक : शहरात स्वाइन फ्लूचा संसर्ग वाढत असून, आत्तापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाला असल्याने महापालिकेच्या आरोग्य विभागाने खासगी वैद्यकीय व्यावसायिकांना तंबी दिली असून, संशयित रुग्ण आढळल्यास त्वरित टॅमिफ्लू द्याव्यात, असे आवाहन केले आहे. योग्य उपचाराअभावी रुग्णाचा मृत्यू झाल्यास संबंधित खासगी वैद्यकीय व्यावसायिकावर थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येईल, असा इशारा दिला आहे. या प्रकारामुळे खासगी व्यावसायिकांत संताप व्यक्त केला जात आहे.
गेल्या वर्षी जानेवारी ते मार्च या कालावधीत एकच स्वाइन फ्लूचा रुग्ण आढळला होता आणि त्याचा मृत्यू झाला होता. परंतु यंदाच्या वर्षी मात्र रुग्ण संख्येत आणि रुग्णांच्या मृत्यूसंख्येत वाढ झाली आहे. १ जानेवारी ते २५ मार्च या कालावधीत ९० स्वाइन फ्लू रुग्ण आढळले असून, तीन जणांचा मृत्यू झाला आहे. ९० स्वाइन फ्लू रुग्णांपैकी ८५ रुग्ण खासगी व्यावसायिकांकडे आढळले होते. तसेच तिघांचा मृत्यू खासगी रुग्णालयातच झाला आहे. त्याचे विश्लेषण करताना संबंधित रुग्ण आधी खासगी क्लिनिकमध्ये उपचार घेतात. परंतु अशाप्रकारचे क्लिनिक चालवणारे वैद्यकीय व्यावसायिक स्वाइन फ्लू म्हणून नोंद करीत नाहीत आणि तसे उपचार करीत नाहीत. रुग्णाचा आजार बळावल्यानंतर अत्यावस्थ होऊन ते मोठ्या खासगी रुग्णालयात दाखल होतात आणि रोगाचे प्रमाण वाढल्याने त्याचा मृत्यू होतो असे प्रकार होत असल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.
कोणताही रूग्ण डॉक्टरांकडे आल्यास त्याच्या परीने तो निदान करीतच असतो. परंतु जर रूग्णाला सर्दी पडसे झाले म्हणून तो उपचारासाठी क्लिनीकमध्ये दाखल झाला. तर त्यावर उपचार केल्यानंतर घरी गेलेल्या उमेदवाराचा नंतर आजार बळावल्यास डॉक्टर जबाबदार कसे काय राहणार? महापालिकेने खासगी वैद्यकिय व्यवसायिकांना रूग्णांवर सुयोग्य उपाचारासाठी आवाहन करणे ठीक परंतु त्यांच्यावर कारवाई करण्याची भूमिका घेणे योग्य नाही.
- डॉ. भालचंद्र ठाकरे, अध्यक्ष, नाशिक जिल्हा होमीओपॅथी हॉक्टर्स असोसिएशन
महापालिकेची आरोग्य व्यवस्था सक्षम नाही. त्यांच्याकडे दीड-दोन वर्षांपासून चांगला फिजिशियन नाही. त्याचप्रमाणे स्वाइन फ्लूसाठी तयार केलेला कक्षदेखील बंद असल्याचे सांगितले जाते. अशावेळी रुग्ण खासगी व्यावसायिकांकडेच दाखल होतात. परंतु त्यासाठी महापालिकेने खासगी व्यावसायिकांना अशाप्रकारे फौजदारी कारवाईची धमकी देणे चुकीचे आहे. - डॉ. नितीन चितळे, सरचिटणीस, आयएमए नाशिक शाखा
कोणत्याही डॉक्टरला रूग्णाचे चुकीचे निदान व्हावे आणि काही विपरीत व्हावे असे वाटत नाही. रूग्ण दाखल झाल्यानंतर जो तो आपल्या पध्दतीने निदान करीत असतो. परंतु स्वाईन फ्ल्यूची लागण झालीच तर ती खूप झपाट्याने होत असते. मुळात उपचार करणारे डॉक्टर देखील संसर्गाच्या धोक्यात असतात. त्यामुळे रूग्ण दगाविल्याचे निमित्त करून कारवाई करण्याचा इशारा देणे म्हणजे एकप्रकारची हुकूमशाहीच आहे.
- डॉ. राहुल पगार, माजी अध्यक्ष, निमा