जिल्हाधिकाऱ्यांचा धाक असावा तर असा....
By Admin | Published: December 7, 2014 01:49 AM2014-12-07T01:49:27+5:302014-12-07T01:57:44+5:30
जिल्हाधिकाऱ्यांचा धाक असावा तर असा....
नाशिक : तसे म्हटले तर कार्यालय हाकेच्या अंतरावर... येताना नाही तरी जाताना मात्र नक्कीच प्रवेशद्वारावरून पुढे मार्गस्थ होण्याशिवाय पर्यायच नसतो. तीच..तीच..गर्दी, लहान मुले-बाळांना कडेवर घेत हातात सेतूच्या चिठ्ठ्या...दलालांचा कार्यालयाला पडलेला गराडा....दिवसभर वाट पाहूनही सायंकाळी शिधापत्रिका हाती न मिळाल्याने संतापाचा झालेला कडेलोट व कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडून दिल्या जाणाऱ्या उद्धट व अरेरावीच्या वागणुकीवरून नियमित होणारी खडाजंगी असे कायमचे चित्र असलेल्या शहर धान्य वितरण कार्यालयाच्या भोवती शनिवारी कोणी फिरकलेच नाही. त्यामुळे वादावादी नाही की, कार्यालयाला जत्रेचे स्वरूप नाही. जणू काही नेहमी गजबजलेले कार्यालय अन्यत्र स्थलांतर झाले असे मनोमन वाटावे अशी परिस्थिती; परंतु हे काय एकाएकी झालेले नाही. एरव्ही जिल्हाधिकारी या कार्यालयाच्या मार्गावरून अनेक वेळा मार्गस्थ झाले, तेव्हा कधी इतकी खबरदारी कधी घेतली गेली नाही, ती शनिवारी प्रत्यक्षात अवतरल्याचे पाहून अनेकांनी तोंडात बोटे घातली. जिल्हाधिकाऱ्यांचा धाक असावा तर असा.....
गेल्या महिन्यांपासून सातत्याने वादात सापडलेल्या शहर धान्य वितरण कार्यालयाच्या कारभाराबाबत लोकप्रतिनिधी, सामान्य जनता व प्रसिद्धीमाध्यमाद्वारे प्रकाशझोत टाकण्यात आला. महिनोन्महिने शिधापत्रिका न मिळणे, कागदपत्रे हरविल्याची सबब पुढे करणे, उद्धट व अरेरावीची वागणूक देणे, एजंट, मध्यस्थांच्या कामांना प्राधान्य देणे अशा एक नव्हे, तर अनेक तक्रारी सातत्याने होत असल्याने जिल्हाधिकारी व जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी शहर धान्य वितरण अधिकाऱ्यांना नोटीस देऊन खुलासा मागवावा लागला. तरीही परिस्थितीत फरक पडला नाही, मात्र जिल्हाधिकारी शनिवारी धान्य वितरण कार्यालयाला भेट देणार अशा नुसत्या वार्तेने सारे वातावरणच पालटले.
एरव्ही कार्यालयात चलन भरून घेणाऱ्या कर्मचाऱ्याच्या अवतीभोवती कोंडाळे करून उभ्या राहणाऱ्या रेशन दुकानदारांना नुसते पिटाळून लावलेच नाही, तर त्यांचे चलनाचे (व त्याखालून दिले-घेतले जाणारे) कागददेखील हातात घेण्यास नकार देण्यात आला. एजंट, दलाल कार्यालयाच्या आवारात फिरकणार नाहीत याची काळजी घेण्याबरोबरच, एखाद्या व्यक्तीच्या हातात स्वत:चीच पावती असेल याची खात्री करून घेण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांच्या पुढ्यात कोणी तक्रारदार येणार नाही याचा पुरेपूर बंदोबस्त करण्यासाठी काही व्यक्तींना तर थेट ‘आज कार्यालय बंद’ असा निरोप देऊन पाठवणी करण्यात आली. दिवसभर कार्यालयात शुकशुकाट तसाच तो कार्यालयाच्या आवारातही अगदीच शांतता...सायंकाळी सहा वाजेपर्यंत.....पण जिल्हाधिकाऱ्यांनी भेट दिलीच नाही !