वाहने तर घेतली, अडगळीत लावली
By admin | Published: December 18, 2014 10:55 PM2014-12-18T22:55:52+5:302014-12-18T22:56:02+5:30
जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांचा प्रकार
नाशिक : जिल्हा परिषदेच्या सहा पैकी दोन पदाधिकाऱ्यांचा अपवाद वगळता जवळपास सर्वच पदाधिकाऱ्यांनी त्यांना मिळालेली सरकारी वाहने एकतर नादुरुस्तीच्या कारणास्तव व दुसरे म्हणजे खासगी वाहनांचाच वापर करण्याच्या अनुषंगाने अडगळीला लावल्याचे समजते.
विशेष म्हणजे सरकारी वाहन घेतल्याशिवाय दर महिन्याला मिळणारा इंधनभत्ता पदाधिकाऱ्यांना मिळणार नसल्याने पदाधिकाऱ्यांनी वाहने घेऊन ती साईड ट्रॅकला लावल्याची चर्चा आहे.
जिल्हा परिषद अध्यक्ष विजयश्री चुंबळे यांना मिळालेले लालदिव्याचे वाहन नवीनच असल्याने त्यांनी त्याचा वापर सुरू केला आहे, तर दुसरीकडे शिक्षण व आरोग्य सभापती किरण पंढरीनाथ थोरे यांनीही त्यांना मिळालेले सरकारी वाहन वापरण्यास सुरुवात केली आहे. उपाध्यक्ष प्रकाश वडजेंसह, कृषी व पशुसंवर्धन सभापती केदा अहेर, महिला व बालकल्याण सभापती शोभा सुरेश डोखळे, समाज कल्याण सभापती उषा शंकर बच्छाव यांनी सरकारी वाहन, तर स्वीकारले आहे, मात्र खासगी वाहनाचाच वापर करीत असल्याचे समजते.
महिला व बालकल्याण सभापती शोभा डोखळे व कृषी सभापती केदा अहेर यांचे वाहन जिल्हा परिषदेच्या आवारातच उभे असल्याचे काल गुरुवारी(दि.१८) चित्र होते. अन्य सभापतींनीही वाहन घेऊन ते निवासस्थासमोर उभे करून ठेवल्याचे समजते. आता वाहन खासगी वाहनांचा आणि इंधन सरकारी तिजोरीचे अशीच काहीशी अवस्था या पदाधिकाऱ्याबाबत असल्याची चर्चा आहे. (प्रतिनिधी)