कामे रेंगाळल्यास स्मार्ट सिटीच्या ठेेकेदारांना दणका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:20 AM2021-09-10T04:20:17+5:302021-09-10T04:20:17+5:30
नाशिक महापालिकेचे आयुक्त कैलास जाधव यांनी गुरुवारी (दि.९) माध्यम प्रमुखांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी स्मार्ट सिटीच्या कामांची गती मंदावल्याची ...
नाशिक महापालिकेचे आयुक्त कैलास जाधव यांनी गुरुवारी (दि.९) माध्यम प्रमुखांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी स्मार्ट सिटीच्या कामांची गती मंदावल्याची कबुली दिली. स्मार्ट सिटी कंपनीची कामे रखडली असून कोरोनामुळे अनेक प्रकल्प सुरू होण्यात अडचणी आल्या. मात्र, आता सर्वच प्रकल्पांची गेल्या दोन महिन्यांपासून नियमित आढावा घेतला जात असून कोरोनानंतरही अकारण कामे खोळंबली आहेत त्या संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असेही आयुक्तांनी सांगितले.
स्मार्ट सिटी कंपनीची सल्लागार कंपनी असलेल्या केपीएमजी कंपनीकडून अपुऱ्या प्रमाणात कामे झाल्याने त्यावरून बरीच भवती न भवती झाली. या कंपनीचे काम थांबवण्याचा प्रस्ताव माजी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थवील यांनी दिला होता. मात्र आता या कंपनीवर कारवाई सुरू केल्यानंतर कंपनीने अगेादरच्याच रकमेत सर्व कामे पूर्ण करून देण्याची तयारी दर्शवली आहे, असे आयुक्तांनी सांगितले.
इन्फो...
पार्किंग लाटणाऱ्यांवर होणार कारवाई
शहरातील वाहतुकीचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. न्यायालयाच्या आदेशामुळे रस्त्यांवरील अतिक्रमणांवर कारवाई करता येत नाही. मात्र आता ज्या इमारतींनी मंजूर नकशात दाखवलेली पार्किंग गिळंकृत केले आहेत, त्यांची तपासणी करण्यात येत असून लवकरच संबंधितांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले.