बळीराजाची फसवणूक कराल तर याद राखा : प्रताप दिघावकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2020 02:02 AM2020-09-10T02:02:51+5:302020-09-10T02:03:46+5:30
परिक्षेत्रातील जिल्ह्णांमध्ये द्राक्ष, कांदा, डाळिंब, केळी, डाळींचे उत्पादक शेतकरी आहेत. काबाडकष्ट करून काळ्या मातीत घाम गाळत शेतकरी शेतमाल पिकवितो; मात्र काही व्यापारी त्यांच्या मालाचा हमीभाव तर देतच नाही; शेतमाल घेऊन पोबारा करतात अन् बनावट धनादेशरूपी कागदाचा तुकडा हातावर टेकवतात. यापुढे बळीराजाची आर्थिक फसवणूक खपवून घेतली जाणार नाही, लबाडी करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या मुसक्या बांधल्या जातील, या शब्दांत बागलाण तालुक्याचे भूमिपुत्र, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. प्रताप दिघावकर यांनी इशारा दिला.
नाशिक : परिक्षेत्रातील जिल्ह्णांमध्ये द्राक्ष, कांदा, डाळिंब, केळी, डाळींचे उत्पादक शेतकरी आहेत. काबाडकष्ट करून काळ्या मातीत घाम गाळत शेतकरी शेतमाल पिकवितो; मात्र काही व्यापारी त्यांच्या मालाचा हमीभाव तर देतच नाही; शेतमाल घेऊन पोबारा करतात अन् बनावट धनादेशरूपी कागदाचा तुकडा हातावर टेकवतात. यापुढे बळीराजाची आर्थिक फसवणूक खपवून घेतली जाणार नाही, लबाडी करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या मुसक्या बांधल्या जातील, या शब्दांत बागलाण तालुक्याचे भूमिपुत्र, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. प्रताप दिघावकर यांनी इशारा दिला.
नाशिक परिक्षेत्राचे महानिरीक्षक म्हणून दिघावकर यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी बुधवारी (दि.९) कार्यालयातील सभागृहात पत्रकारांशी संवाद साधला.
यावेळी त्यांनी नाशिक परिक्षेत्रातील पाचही जिल्ह्णांच्या कायदा-सुव्यवस्थेचा धावता आढावा संबंधित पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षकांकडून जाणून घेतला आहे. त्यादृष्टीने निश्चित परिक्षेत्राचे पोलीस दल कोरोनाशी लढा देत सक्षमपणे कायदा-सुव्यवस्थेची अंमलबजावणी करणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.
परराज्यांच्या सीमांवर करडी नजर
नाशिक परिक्षेत्रातील नंदुरबार, नाशिक, धुळे, जळगाव या जिल्ह्यांना गुजरात, मध्य प्रदेश या राज्यांच्या सीमा लागून आहेत. जिल्ह्यांच्या या सीमावर्ती नाक्यांवर विशेष बंदोबस्त व पेट्रोलिंगचे नियोजन संबंधित जिल्हा पोलीस अधीक्षकांद्वारे केले जाणार आहे. सीमावर्ती भागातून होणारी अवैध मद्य तस्करी, शस्र तस्करी, गुटखा तस्करी रोखण्यासाठी पोलीस प्राधान्य देतील.
भेटण्यासाठी ‘अपॉइन्टमेंट’ची गरज नाही
मी जनतेचा सेवक असून, पोलीस शिपायापासून तर सर्वसामान्य व्यक्तीकरिता माझ्या दालनाचे दरवाजे कार्यालयीन वेळेत खुले राहणार आहेत. तसेच माझ्या वैयक्तिक भ्रमणध्वनी क्रमांकावर ९७७३१४९९९९ कोणी कधीही कायदा-सुव्यवस्थेसंदर्भात थेट संपर्क साधू शकतो, असे ते म्हणाले. मला भेटण्यासाठी कुठलाही दुवा किंवा अपॉइन्टमेंटची गरज सर्वसामान्यांना भासणार नाही, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. अशाप्रकारे आपला मोबाइल क्रमांक जाहीर करणारे ते नाशिक परिक्षेत्राचे पहिलेच विशेष महानिरीक्षक आहेत.
कॉन्स्टेबलना गुन्हेगार
दत्तक देणार
चेन स्नॅचिंग, दरोडे, लूटमार, घरफोड्यांसारखे गुन्हे रोखण्यासाठी प्रति कॉन्स्टेबल एक गुन्हेगार याप्रमाणे ‘गुन्हेगार दत्तक योजना’ नाशिकसह परिक्षेत्रातील सर्वच जिल्ह्णांत राबविण्याचे आदेश पोलीस अधीक्षकांना देण्यात येणार आहे. याद्वारे गुन्हेगारीची पाळेमुळे उखडून फेकण्यास मदत होणार आहे, तसेच पोलिसांमध्ये काही प्रमाणात दिसणारी मरगळसुद्धा दूर होण्यास मदत होणार असल्याचे दिघावकर म्हणाले.