विचार पटत नसतील तर इथेच विरोध करा : इंदोरीकर महाराजांचे विरोधकांना आव्हान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2020 06:39 PM2020-02-18T18:39:25+5:302020-02-18T18:42:05+5:30
लोकमत न्युज नेटवर्क नाशिक : अपत्ये होण्यावरून समाजमाध्यम तसेच अंधश्रद्धा निर्मुलन समितीकडून टिकेचे धनी झालेले किर्तनकार इंंदोरीकर महाराज यांनी ...
लोकमत न्युज नेटवर्क
नाशिक : अपत्ये होण्यावरून समाजमाध्यम तसेच अंधश्रद्धा निर्मुलन समितीकडून टिकेचे धनी झालेले किर्तनकार इंंदोरीकर महाराज यांनी या वादावर पडदा टाकण्यासाठी जाहीर दिलगिरी व्यक्त केली असली तरी, त्यांच्या विरोधातील वाद शमत नसल्याचे पाहून मंगळवारी त्यांनी आडगाव येथे किर्तन करताना ‘माझे विचार पटत नसतील इथेच विरोध असल्याचे सांगा, पुढे मागे तक्रारी करू नका’ असे आवाहन केले. त्याचबरोबर ‘गेल्या २६ वर्षांत जेवढा त्रास झाला नाही, त्यापेक्षा अधिक त्रास गेल्या आठ दिवसांपासून होत असल्याची खंतही बोलून दाखविली.
आडगाव येथे येथे सार्वजनिक शिवजयंती सोहळ्यानिमित्त मंगळवारी (दि.१८) रोजी ह.भ.प. निवृत्ती महाराज (देशमुख) इंदोरीकर यांचे किर्तन आयोजित करण्यात आले होते. भर उन्हात झालेल्या या किर्तनासाठी पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी प्रचंड गर्दी केली. दुपारी दिड वाजेच्या सुमारास ह.भ.प. इंदोरीकर महाराज यांचे आडगावमध्ये आगमन होताच त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. ढोलताशांच्या गजरात बैलगाडीवरून त्यांची स्वागत मिरवणूक काढण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून इंदोरीकर महाराज यांनी मुलगा-मुलगी जन्माबाबत केलेल्या वक्तव्यावरून वाद सुरू झाला असून, त्यातून चार दिवसांपुर्वी ‘वाद शमला नाही तर किर्तन सोडून शेती व्यवसाय करू’ असे उदिग्न होवून त्रागा बोलून दाखविला होता. त्यातून अनेक सामाजिक व राजकीय संघटना, लोकप्रतिनिधी इंदोरीकर महाराज यांच्या पाठीशी उभ्या राहिल्याने एकीकडे त्यांचे विरोधक व दुसरीकडे समर्थक असा सामना होण्याची शक्यता निर्माण झालेली असताना इंदोरीकर महाराजांनी वाद शमविण्यासाठी जाहीर दिलगिरी व्यक्त केली. त्यामुळे आडगावी होणाऱ्या किर्तनात महाराज काय बोलतात याकडे साऱ्यांचे लक्ष लागले होते. परंतु फारसे वादात न पडता, इंदोरीकर महाराज यांनी किर्तनाच्या प्रारंभीच उपस्थितांना उद्देशून किर्तनात जे काही सांगेल, ते माझे विचार पटत नसतील तर इथेच विरोध करा, नंतर तक्रारी करू नका असे आवाहन करून आपली सामंजस्यपणाची भूमिका जाहीर केली. त्यानंतर मात्र त्यांनी नेहमीच्या शैलीत समाजप्रबोधनपर मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना त्यांनी प्रथम शिवरायांना अभिवादन केले. वयाच्या १६ व्या वर्षी स्वराज्य स्थापनेचा निश्चय करत स्वत:चे स्वराज्य निर्माण करणारे शिवराय हे पहिले राजे असल्याचे मत व्यक्त करून, एक गाव एक शिवजयंती साजरी करत गावाच्या एकत्रीकरणाची सुरवात करणाºया आडगाव ग्रामस्थांचे कौतुक केले.