परवाना असेल तर घरपोच मिळेल मद्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:13 AM2021-04-17T04:13:12+5:302021-04-17T04:13:12+5:30
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाकडून विविध निर्बंध लादण्यात आले आहेत. विविध वस्तू, सेवांवर बंदी घालण्यात आली आहे. मागील ...
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी
राज्य शासनाकडून विविध निर्बंध लादण्यात आले आहेत. विविध वस्तू, सेवांवर बंदी घालण्यात आली आहे. मागील पंधरवड्यापासून शहरासह जिल्ह्यात सर्वत्र मद्यविक्रीवर प्रतिबंध घालण्यात आला आहे. मद्यविक्रीला परवानगी नसल्याने मद्यपींची चांगलीच कोंडी झाली आहे, काहींनी तत्पूर्वी स्टॉक करून घेतल्यामुळे त्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र आता परवानाधारक मद्यपींना मद्यविक्रेत्यांकडून थेट घरपोच मद्य मागविता येणार आहे.
मात्र आता राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्ह्यातील सर्व रेस्टॉरन्ट व बारला फक्त होम डिलिव्हरी सेवेला परवानगी दिली आहे. तसेच मद्यविक्रीच्या दुकानजवळ कर्मचारी वगळून अन्य कोणत्याही नागरिकांना प्रवेश निषिद्ध करण्यात आला आहे. बाहेरील ग्राहकांसाठी वरीलप्रमाणे इतर रेस्टॉरन्ट आणि बारप्रमाणेच बंधने पाळली जातील. मार्गदर्शक सूचनांनुसार सर्व हॉटेल, बार, मद्यविक्रीच्या दुकानांवरील कर्मचा-यांना कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण करून घेणे अनिवार्य राहणार आहे.
परवानाधारक मद्य विक्रेते सकाळी ७ ते रात्री ८ वाजेपर्यंत परवानाधारक ग्राहकांना मद्य पुरवठा त्यांच्या मागणीनुसार केवळ घरपोच करू शकतील.
----इन्फो====
होम डिलिव्हरी बॉयचे लसीकरण गरजेचे
घरपोच सेवा देणाऱ्या सर्व कर्मचा-यांचे लसीकरण करणे बंधनकारक असून, ज्या ठिकाणी घरपोच सेवा द्यावयाची आहे त्या घर किंवा इमारतीच्या प्रवेशाद्वारापर्यंच सेवा पुरविण्यासाठी मुभा देणात आली आहे. वरील आदेशाचे तसेच कुठल्याही प्रकारे नियमांचा भंग केल्याचे आढळून आल्यास मद्यविक्रेत्याला १० हजार रुपयांचा दंड करण्यात येणार असल्याचे आदेशात म्हटले आहे. दंडात्मक कारवाईनंतरही वारंवार उल्लंघन झाल्यास मद्यविक्रीचा परवाना तत्काळ रद्द करण्यात येईल, असा इशारा राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिला आहे.