उमेदवारी नाकारल्यास विचारणार जाब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2019 01:23 AM2019-03-23T01:23:02+5:302019-03-23T01:25:21+5:30
गेल्यावेळी राष्टवादी कॉँग्रेसच्या ज्या उमेदवाराला भाजपाने अडीच लाख मतांनी पराभूत केले त्या डॉ. भारती पवार यांनी नुकताच मुंबई येथे भाजपात प्रवेश केला असून, त्यामुळे खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
नाशिक : गेल्यावेळी राष्टवादी कॉँग्रेसच्या ज्या उमेदवाराला भाजपाने अडीच लाख मतांनी पराभूत केले त्या डॉ. भारती पवार यांनी नुकताच मुंबई येथे भाजपात प्रवेश केला असून, त्यामुळे खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी नाराजी व्यक्त केली आहे. पवार यांना उमेदवारी दिली तर तो माझ्यावर अन्यायच ठरेल अशी भावना व्यक्त करणाऱ्या चव्हाण यांनी यासंदर्भात निर्णय घेण्यासाठीे पक्षाचा मेळावाही आयोजिला आहे.
खासदारकीची हॅट््ट्रिक करणाऱ्या चव्हाण यांना सहजासहजी उमेदवारी मिळणार नाही अशी भाजपात चर्चा होती. गेल्या लोकसभा निवडणुकीत हरिश्चंद्र चव्हाण यांनी भारती पवार यांचा दोन लाख ४७ हजार मतांनी पराभव केला होता. आताही त्या राष्टÑवादीच्या संभाव्य उमेदवार मानल्या जात होत्या. परंतु शिवसेनेतून राष्टÑवादीत दाखल झालेल्या धनराज महाले यांना उमेदवारी देण्यात आल्यानंतर भारती पवार यांची आशा संपुष्टात आली. त्यानंतर त्या भाजपात दाखल झाल्या. परिणामी खासदार हरिश्चंद्र चव्हाण उमेदवारीसाठी वेटिंगवर आहेत. त्यापार्श्वभूमीवर शुक्रवारी (दि. २२) दुपारी चव्हाण यांच्या नाशिकमधील निवासस्थानी समर्थकांची तातडीची बैठक घेण्यात आली. यात चव्हाण यांना डावलून भारती पवार यांना प्रवेश देण्यात आल्याने संघटनेवरच तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. पक्षाशी संबंधित नसलेल्यांना अशाप्रकारे पक्षात स्थान देणे गैर आहे, असे सांगतानाच यावेळी मतदारसंघातील समर्थकांची बैठक घेऊन भूमिका निश्चित करण्याचे ठरविण्यात आले.
दरम्यान, भारती पवार यांच्या प्रवेशाचे स्वागतच, मात्र मला डावलून त्यांना तिकीट मिळाले तर तो माझ्यावर अन्याय ठरेल, असे खासदार चव्हाण यांचे म्हणणे आहे. भारती पवार यांच्या प्रवेशाबाबत मला कुठलीही विचारणा झाली नव्हती असे सांगून आपल्या उमेदवारीबाबत अद्याप दिल्लीत कोणत्याही प्रकारचा निर्णय झालेला नाही, परंतु पक्ष विचार करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. गेली पंधरा वर्षे संसदेतील माझे कामकाज पक्षाचे वरिष्ठ नेते बघत आहेत. त्यामुळे त्यांनी माझ्या कामगिरीची तुलना करून निर्णय घेतला पाहिजे, असेही ते म्हणाले.
मग तो सर्व्हे कोणता?
हरिश्चंद्र चव्हाण यांची उमेदवारी अडचणीत आणण्याला एक सर्व्हे कारणीभूत असल्याचे सांगितले जाते. मग, राष्टवादीला ज्या उमेदवाराच्या विजयाची खात्री नव्हती, तो उमेदवार भाजपाच्या सर्व्हेत यशस्वी कसा ठरला, असा प्रश्न कार्यकर्त्यांनी यावेळी केला.