सावधान! ट्रिपल सीट प्रवास कराल तर हजार रुपयांचा बसेल भुर्दंड

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2021 01:06 PM2021-12-15T13:06:40+5:302021-12-15T13:09:14+5:30

मोटार वाहन कायदा कलम-१७७ नुसार एका दुचाकीवरून तिघांनी प्रवास करणे हा गुन्हा ठरतो. यामध्ये दंडात्मक कारवाईची तरतूद करण्यात आली ...

If you travel in a triple seat, thousand rupees fine in nashik | सावधान! ट्रिपल सीट प्रवास कराल तर हजार रुपयांचा बसेल भुर्दंड

सावधान! ट्रिपल सीट प्रवास कराल तर हजार रुपयांचा बसेल भुर्दंड

googlenewsNext

मोटार वाहन कायदा कलम-१७७ नुसार एका दुचाकीवरून तिघांनी प्रवास करणे हा गुन्हा ठरतो. यामध्ये दंडात्मक कारवाईची तरतूद करण्यात आली आहे. यापूर्वी दंडाची रक्कम कमी असल्याने ट्रिपल सीट प्रवास करणाऱ्यांची संख्याही कमी झालेली नाही. सर्रासपणे ट्रिपल सीट प्रवास दुचाकीवरून केला जात असल्याचे चित्र अद्यापही शहरात पाहावयास मिळते. केंद्राच्या नवीन कायद्याची राज्यात अंमलबजावणी सुरू झाल्यामुळे दुचाकीवरुन ट्रिपल सीट जाताना पोलिसांच्या तावडीत सापडल्यास दुचाकीचालाकाला थेट हजार रुपये द्यावे लागणार आहेत. यामुळे आता दुचाकीवरून ट्रिपल सीट जाताना शंभरदा विचार करावा लागणार आहे. नवीन मोटार वाहन कायद्यानुसार आता सुमारे पन्नास वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास किरकोळ म्हणून ५०० रुपयांचा दंड वाहतूक पोलिसांकडून आकारला जाणार आहे.

नव्या नियमानुसार कारवाई सुरू

नव्या नियमानुसार ट्रिपल सीट दुचाकीचालकांवर दोन दिवसांपासून कारवाईला प्रारंभ करण्यात आला आहे. यामुळे अद्याप तरी दखलपात्र अशी कारवाई झालेली नाही. मात्र ट्रिपल सीट दुचाकीने जाताना आढळून आल्यास वाहतूक पोलिसांकडून ई-चलानमार्फत थेट ५०० रुपयांचा दंड संबंधित वाहनचालकाकडून आकारला जात असल्याचे वाहतूक नियंत्रण शाखेच्या सूत्रांनी सांगितले.

दंड नवा, मानसिकता जुनी

राज्य शासनाने केंद्राचा मोटार वाहन कायदा लागू केला आहे. यामुळे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणे आता महागात पडू लागले आहे. एकीकडे दंडाची रक्कम जरी वाढली असली तरी नागरिकांच्या मानसिकतेत बदल झालेला दिसून येत नाही. यामुळे दंड नवा, मात्र ‘हम नहीं सुधरेंगे’ ही मानसिकता जुनी जैसे थे आहे, अशी चर्चा आता वाहतूक पोलिसांच्या वर्तुळातदेखील होऊ लागली आहे.

१२ डिसेंबरपासून अंमलबजावणी

नव्या मोटार वाहन कायद्यानुसार शहरात वाहतूक शाखेकडून १२ डिसेंबरपासून नव्या तरतुदीनुसार दंडात्मक कारवाई केली जात आहे. या कायद्याची अंमलबजावणी करण्यास वाहतूक पोलिसांनी सुरुवात केली आहे. त्यामुळे आता वाहनचालकांनी अत्यंत सावधगिरीने व शिस्तीने वाहन चालविणे गरजेचे आहे, अन्यथा खिशाला मोठा भुर्दंड बसू शकतो.

राज्य सरकारकडून केंद्राचा मोटार कायदा लागू करण्याचा निर्णय घेतला गेला आहे. या कायद्यानुसार पोलिसांकडून अंमलबजावणी केली जात आहे. नागरिकांनी वाहतुकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन केल्यास दंडाच्या कारवाईला सामोरे जावे लागणार नाही. दंडाच्या रकमेत नव्या कायद्याप्रमाणे वाढ झाली आहे. यामुळे नागरिकांनी विनाकारण वाद घालू नये.

- सीताराम गायकवाड, सहायक पोलीस आयुक्त, वाहतूक शाखा

 

Web Title: If you travel in a triple seat, thousand rupees fine in nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.