माझ्या बदलीमुळे नाशिकचा विकास होणार असेल तर जरूर बदली करा- तुकाराम मुंढे
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2018 06:28 PM2018-08-28T18:28:28+5:302018-08-28T18:51:23+5:30
माझ्या बदलीमुळे नाशिकचा विकास होणार असेल तर निश्चितच बदली करा
नाशिक- माझ्या बदलीमुळे नाशिकचा विकास होणार असेल तर निश्चितच बदली करा, अशी खंत नाशिक महापालिका आयुक्त तुकाराम मुंढेंनी व्यक्त केली आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखती त्यांनी हे बोलून दाखवलं आहे. नगरसेवक निधी हा 75 लाखांच्या घरात असतो. कायद्यानुसार नगरसेवक निधी बजेटच्या 2 टक्के असतो, तो कायम ठेवलेला आहे. गेल्या पाच वर्षांत नगरसेवकांनी 75 लाखांमधला एक रुपयाही खर्च केलेला नाही. कायद्याच्या चौकटीत राहूनच मी कारवाई केलेली आहे. नगरसेवकांच्या लांगुलचालनाला मी थारा देत नाही, म्हणून नगरसेवकांना त्यांचा अपमान करतो असे वाटत असेल, तर ते अत्यंत चुकीचं आहे.
जी गोष्ट अयोग्य आहे, कायद्याच्या चौकटीत बसत नाही, अशा गोष्टी मी कराव्यात ही नगरसेवकांची माझ्याकडून अपेक्षा आहे. त्यामुळे जर त्यांना मी चुकीच्या पद्धतीनं काम करत असेल असं वाटत असेल, तर ते नागरिकांनी ठरवायचं आहे. ज्यांनी अविश्वास ठराव आणला त्यांनी ठरवायचं आहे. माझं काम हे नाशिकच्या विकासासाठी सुरू आहे. तरीही माझी बदली करायची इच्छा मुख्यमंत्र्यांनी अवश्य करावी, परंतु नगरसेवकांनी केलेले आरोप हे तकलादू आहेत. त्यामुळे मी त्यांना फार महत्त्व देत नाही, असंही तुकाराम मुंढेंनी स्पष्ट केलं आहे.
तुकाराम मुंढेंना नागरिकांचा पाठिंबा
मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विरोधात भाजपा नगरसेवक यांनी केलेल्या अविश्वास ठरावाविरुद्ध मुंढे यांच्या पाठिशी उभे राहण्यासाठी शासकीय विश्रामगृह येथे नागरिकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी राजू देसले, हंसराज वडघुले, निशिकांत पगारे, समाधान भारती, योगेश कापसे, ज्योती नटराजन, राकेश पवार, स्वप्निल घिया,अभिजीत गोसावी, दत्तू बोडके आदींसह नागरिक उपस्थित होते.
'वाचवा कमिशनर' अभियान राबविण्यासाठी सर्वसामान्य नाशिककर एकवटले
नाशिक सत्ताधारी भाजपाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतलेल्या नाशिकमध्ये महापालिकेत सत्ता असलेल्या भाजपाने कायद्याच्या चौकटीत राहून स्वच्छ प्रशासन आणि कारभार करणाऱ्या तुकाराम मुंढे यांच्याविरोधात अविश्वास ठराव आणण्याच्या हालचाली सुरू केले आहेत, या पार्श्वभूमीवर नाशिकमध्येच सोशल मीडियाच्या माध्यमातून काही नाशिककर मुंडेंच्या समर्थनात एकवटले आहे. 'वाचवा कमिशनर' हे अभियान हाती घेण्याचे ठरविण्यात आले आहे.