सणानिमित्तचा उत्साह टिकवून ठेवायचा असेल तर सावधानताही गरजेची दीपज्योतीचा प्रकाश भयाची काजळी दूर करो!

By किरण अग्रवाल | Published: November 15, 2020 01:04 AM2020-11-15T01:04:19+5:302020-11-15T01:06:55+5:30

यंदाच्या दिवाळीला कोरोनाच्या महामारीचा पदर लाभून गेला आहे खरा; पण त्याची भीती अगर दडपण न बाळगता प्रकाशपर्व साजरे होताना दिसत आहे. अर्थात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांची संख्याही कमी झाल्याने काहीसे हायसे वातावरण आहे, शिवाय किती दिवस हातावर हात बांधून घरात बसून राहणार म्हणूनही जनजीवन पूर्वपदावर आले आहे. गेल्या आठवडाभरात तर बाजारपेठा अक्षरश: ओसंडून वाहिलेल्या दिसल्या. सर्वत्रच उत्साहाचे व चैतन्याचे वातावरण आहे.

If you want to maintain the excitement of the festival, you need to be careful. | सणानिमित्तचा उत्साह टिकवून ठेवायचा असेल तर सावधानताही गरजेची दीपज्योतीचा प्रकाश भयाची काजळी दूर करो!

सणानिमित्तचा उत्साह टिकवून ठेवायचा असेल तर सावधानताही गरजेची दीपज्योतीचा प्रकाश भयाची काजळी दूर करो!

Next

सारांश


किरण अग्रवाल
कोरोनामुळे गेल्या सहा-सात महिन्यांत अर्थकारण डळमळीत झाले होते; परंतु दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बाजार असा फुलला की काहींचा गेल्या वर्षभरात जेवढा व्यवसाय झाला नव्हता त्यापेक्षा अधिक या आठवडा, पंधरा दिवसांत घडून आल्याचे दिसून आले. वाहन विक्री असो, की सुवर्ण खरेदी; तेथेही गर्दी आणि रांगा लागलेल्या दिसत आहेत. संकटावर मात करून आशा, उत्साहाचे दीप चहूकडे उजळले आहेत.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे, दिवाळी साजरी करताना नेहमीप्रमाणे उत्साह ओसंडून वाहत असला तरी सद्य:स्थितीतील कोरोनाच्या संकटाचे भान बाळगत नागरिकांनी व विशेषत: घरातील लहानग्यांनी फटाक्यांपासून दूर राहणे पसंत केल्याचे प्रामुख्याने दिसून येत आहे. फटाक्याच्या धुराने होणारे वायुप्रदूषण व त्याचा कोरोनाबाधितांना श्वसनासाठी होणारा त्रास लक्षात घेता यंदा फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचे आवाहन करण्यात आले होते, त्याला खूपच चांगला प्रतिसाद लाभलेला दिसून येत आहे. यामुळे व्यावसायिकदृष्ट्या या व्यापारात गुंतवणूक करून बसलेल्यांना नुकसानीला सामोरे जावे लागले हेही खरे, परंतु जिवाच्या आकांतापुढे आर्थिक नुकसान थिटेच ठरावे हे त्याहून खरे. तेव्हा यंदाची फटाकेमुक्त दिवाळी ही जनतेच्या सामाजिक भानाचे व जागृत अवस्थेचे निदर्शक म्हणावयास हवी. हरित लवादाच्या निर्देशाप्रमाणे फटाकेबंदी असली तरी, जनतेनेही स्वयंस्फूर्तीने त्यास सकारात्मक प्रतिसाद दिला ही बाब विशेषत्वाने लक्षात घेण्याजोगी आहे.
अर्थात दिवाळी आनंदात जात असली तरी यापुढील संभाव्य संकटे लक्षात घेता गाफील राहून चालणार नाही. दिवाळीच्या निमित्ताने बाजारपेठांमध्ये जी गर्दी उसळून आलेली दिसली त्यात फिजिकल डिस्टन्स तितकेसे पाळले गेले नाही. अनेकांकडून मास्कचा वापरदेखील केला जाताना दिसत नाही. तेव्हा अशा प्रकारची बेफिकिरी टाळणे गरजेचे आहे. फटाकेमुक्ती जशी मनावर घेतली गेली त्याच पद्धतीने कोरोनापासून बचावण्यासाठीच्या निर्देशित उपाययोजनांबाबत गांभीर्य बाळगले जाणे अपेक्षित आहे. सार्वजनिक ठिकाणी वावरताना व वाहतूक व्यवस्थेत तर अधिक काळजी घ्यायला हवी. दिवाळीनिमित्त कुटुंबा-कुटुंबात व समूहा-समूहात भेटीगाठी घेऊन आनंद वाटून घेण्याची पूर्वापार परंपरा चालत आली आहे. कोरोनाचे संकट लक्षात घेता यंदा या भेटीगाठीदेखील टाळायला हव्यात. संपर्क व शुभेच्छांसाठी सोशल मीडियासारखी आधुनिक माध्यमे हाती आली आहेतच, तेव्हा यंदा त्याद्वारेच व्हर्च्युअल शुभेच्छांच्या आदान-प्रदानावर समाधान मानायला हवे. दिवाळीनंतर बाजारात येणारी काहीशी निवांतता लक्षात घेता बरीच मंडळी हल्ली पर्यटनासाठी बाहेर पडतात, तेव्हा त्याही बाबतीत यंदाची स्थिती बघता काळजी घ्यायला हवी.
सारांशात, दिवाळीच्या निमित्ताने अर्थचक्र सुरळीत झाल्याचे चित्र आहे. कोरोनाच्या भीतीतून बाहेर पडून हे चक्र फिरले आहे. तेव्हा बाजारातला उत्साह टिकवून ठेवायचा असेल तर कोरोनासंबंधातील सावधानताही बाळगली जाणे आत्यंतिक गरजेचे आहे. त्यासाठी वास्तविकतेच्या अनुषंगाने प्रथांना व भावनांना आवर घालणे हेच सुरक्षेचे तसेच शहाणपणाचे ठरणार आहे. सध्या थंडीचा कडाका अनुभवास येत असून, आणखी काही दिवस अशीच स्थिती राहण्याची शक्यता आहे. ही स्थिती संसर्गाला पोषक असल्याने यासंबंधीचे भय वाढून जाणे स्वाभाविक ठरले आहे.
इच्छाशक्ती प्रबळ असली की संकटांवर किंवा अडचणींवर मात करून पुढे जाता येते. सण व उत्सवातील उत्साह तर कशानेही रोखला जात नाही, त्यामुळेच कोरोनातून निर्माण झालेली भयग्रस्तता दूर सारून दिवाळी साजरी होताना दिसते आहे; पण असे असले तरी सावधानतेचे भान सुटता कामा नये. दिवाळीतील गोडाधोडाचा गोडवा व प्रकाशपर्वाची ऊर्जा अक्षय राखायची असेल तर ‘दो गज दुरी, मास्क है जरुरी’ विसरता येऊ नये.
 

 

Web Title: If you want to maintain the excitement of the festival, you need to be careful.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Divaliदिवाळी