इगतपुरी लोक अदालतीत ६१ प्रलंबित प्रकरणे निकाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2019 05:56 PM2019-12-16T17:56:42+5:302019-12-16T17:57:10+5:30
घोटी : इगतपुरी तालुक्यात आयोजित लोक अदालतीत ६१ प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यात आली. या निकाली प्रकरणातून शासनाची सुमारे पन्नास लाखांची वसूली झाली आहे.
इगतपुरी न्यायालयात प्रलंबित प्रकरणे व दाखलपुर्व प्रकरणासाठी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. इगतपुरी तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने या उपक्रमास प्रतिसाद दिला. यामध्ये ६१ प्रलंबित प्रकरणे निकाली काढून १३ लाख, ४८ हजार ५६८ रूपयांची भरपाई पक्षकारांना मिळवुन देण्यात आली. १ हजार ४५८ दाखलपुर्व प्रकरणे निकाली काढण्यात आली. या माध्यमातून शासनाला ४९ लाख, ९६ हजार ७१८ रु पयांची वसुली मिळाली. राष्ट्रीय लोकअदालतीच्या यशस्वीतेसाठी इगतपुरी न्यायालयाच्या दिवाणी न्यायाधीश श्रीमती आर. एन. खान व सह दिवाणी न्यायाधीश श्रीमती एल. के. सपकाळ यांचे मार्गदर्शन लाभले. इगतपुरी न्यायालयातील वकील वर्ग, इगतपुरी तालुका विधी सेवा समितीचे कर्मचारी एम. डी. मंडाले यांनी परिश्रम घेतले.