इगतपुरीत पावसाचा दणका; भातपिकावर संक्रांत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2019 11:20 PM2019-10-24T23:20:22+5:302019-10-25T00:29:46+5:30
भाताचे कोठार आणि पावसाचे माहेरघर असणाऱ्या इगतपुरी तालुक्यात भातपिकाची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. यंदा पावसाने सुरुवातीला चांगली हजेरी लावल्याने पीकही बहरले आहे; मात्र तीन दिवसांपासून संततधार पावसाने या पिकाला दणका दिला आहे.
वैतरणानगर : भाताचे कोठार आणि पावसाचे माहेरघर असणाऱ्या इगतपुरी तालुक्यात भातपिकाची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. यंदा पावसाने सुरुवातीला चांगली हजेरी लावल्याने पीकही बहरले आहे; मात्र तीन दिवसांपासून संततधार पावसाने या पिकाला दणका दिला आहे. भातपिकाला धोका निर्माण झाला असून, करपा आणि कडा करपा या रोगांनी पिकावर आक्रमण केल्याने पिकावर संक्रांत आली आहे. यामुळे उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
ढगाळ वातावरणामुळे दोन्ही रोगांचा प्रभाव प्रामुख्याने पीकवाढीच्या सर्वच अवस्थेवर परिणाम झाल्याने तसेच ऐन बहरात आलेले भातपीक करपा व विविध रोग सदृश परिस्थितीमुळे भातपिकाच्या उत्पादनात घट होणार आहे. त्यामुळे आधीच नुकसान सोसल्याने व परतीच्या पावसामुळे रब्बी हंगाम लांबत जाणार असल्यामुळे बळीराजा धास्तावला आहे. इगतपुरी तालुक्यात सलग तीन दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे जनजीवनही विस्कळीत झाले आहे. पिकांचे नुकसान झाले असून, याकडे तालुका कृषी विभागाचा काणाडोळा होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. तत्काळ पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
भात लागवडीसाठी लाखो रुपयांची कर्जे घेऊन हातातोंडाशी आलेला घासही निसर्गाच्या अवकृपेमुळे निघून जाण्याच्या मार्गावर असल्याने शेतकरी ऐन सणासुदीत चिंता व्यक्त करीत आहे.
द्राक्ष उत्पादक चिंतित
पांडाणे : दिंडोरी तालुक्यातील चौसाळा, करंजखेड, सारसाळे, खोरीपाडा, माळे दुमाला परिसरात बुधवारी सायंकाळी ५ वाजता पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे द्राक्षबागायतदार व भात उत्पादकांच्या तोंडाचे पाणी पळाले आहे.
दिंडोरी तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील भात, नागली, वरी, उडीद, मूग पिकाचे नुकसान झाले असून, हातातोंडाशी आलेला घास हिरावल्यामुळे बळीराजा चिंतित आहे. भुईमूग व भात पीक उतरून पडणार की काय अशी स्थिती निर्माण झाली असून, नुकसान झालेल्या पिकांचा त्वरित पंचनामा करण्याची मागणी ग्रामस्थ करीत आहेत.