इगतपुरी तालुका विकासाच्या वाटेवर....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:10 AM2021-07-12T04:10:17+5:302021-07-12T04:10:17+5:30

घोटी : महाराष्ट्राच्या नकाशावर इगतपुरी तालुका विविध क्षेत्रात विकासाच्या दिशेने आपले पाऊल टाकत असून पुढील पाच वर्षात राज्यात आंतरराष्ट्रीय ...

Igatpuri taluka on the path of development .... | इगतपुरी तालुका विकासाच्या वाटेवर....

इगतपुरी तालुका विकासाच्या वाटेवर....

googlenewsNext

घोटी : महाराष्ट्राच्या नकाशावर इगतपुरी तालुका विविध क्षेत्रात विकासाच्या दिशेने आपले पाऊल टाकत असून पुढील पाच वर्षात राज्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन, औद्योगिक, शैक्षणिक, आरोग्य, शेती, क्रीडा, पंचतारांकित हॉटेल्स, चित्रपट निर्मीती, मेडिटेशन सेंटर, अशा विविध प्रकारचे हब तालुक्यात येण्याचे चिन्हे दिसत आहेत.

इगतपुरी तालुक्यात जगप्रसिद्ध विपश्यना विश्व विद्यापीठ, कुंभमेळ्याचे मूलस्थान कपिलधारा तीर्थ कावनई, टाकेद येथील जटायू मंदिर, गजानन महाराजांची तपोभूमी पंपासरोवर, नाशिक-नगरच्या सरहद्दीवरील महाराष्ट्रातील सर्वांत उंच शिखर कळसूबाई, अशा विविध क्षेत्रांकरिता जगाच्या नकाशावर तालुक्याचा नावलौकिक आहे.

सह्याद्रीच्या पर्वत रांगांमध्ये वसलेले इगतपुरी हे सर्वांच्या पसंतीचे ठिकाण बनले आहे. उद्योगांसाठी अनुकूल वातावरण असल्याने पुढील काळात सर्वोत्कृष्ट पर्यटनस्थळ बनणार आहे. मुंबईपासून काही तासांच्या अंतरावर असलेल्या इगतपुरी तालुक्याला पुढील काही वर्षानंतर वेगळा नावलौकिक निर्माण होणार आहे.

समृद्धी महामार्गाचे काम प्रगतिपथावर असून मुंबई-इगतपुरी अंतर आणखी कमी होणार असल्याने मुंबईसह इतर भारतभरातून उद्योजक आपला व्यवसाय निर्मितीसाठी इथे येण्यास उत्सुक आहेत. भावलीसारख्या निसर्गाने नटलेल्या परिसराला भारतातील पर्यटन व्यावसायिकांना भुरळ पडली असून पंचतारांकित हॉटेल्स लवकरच या ठिकाणी थाटली जाणार आहेत.

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गामुळे तालुका समृद्ध होण्याच्या दिशेने जात असून मुंबई जवळ असल्याने गोंदे औद्योगिक इंडस्ट्रीज मोठ्या प्रमाणावर आपले बस्तान बसवायला सुरुवात करीत आहेत. नाशिक जिल्ह्यात गोंदे एमआयडीसीला प्रथम पसंती झाली असून विदेशी कंपन्यांना दळणवळणाची साधने सुकर झाले असल्याने पुढील काळात उद्योगाला झळाळी मिळणार यात शंका नाही. ऑस्ट्रेलियाच्या मोठ्या कंपनीने पंचतारांकित हॉस्पिटल उभारणी करण्यासाठी त्यांची चाचपणी सुरू केली असून इगतपुरी तालुक्यातील अनुकूल वातावरणामुळे त्यांच्या उद्योगाची उभारणी होण्याची दाट शक्यता आहे.

हिरवी चादर पांघरलेल्या तालुक्याला चित्रपटसृष्टीने पण भुरळ पाडली आहे. चित्रपटसृष्टी निर्मितीसाठी, क्रीडाविश्वासाठी मैदाने, स्पोर्ट्स क्लब, तयार करण्याचे स्वप्न पुढील काळात ते पूर्ण होतील अशी आशा आहे.

इगतपुरी तालुक्यातील प्रमुख बाजारपेठ असलेल्या घोटी शहराचा विकास मोठ्या प्रमाणात होत असून घोटी ग्रामपालिकेने केलेल्या पाठपुराव्याने भावली धरणातून थेट नळ पाणी पुरवठा योजनेला तांत्रिक मंजुरी मिळाली असून लवकरच कोट्यवधी रुपयांची योजना कार्यान्वित होणार आहे. घोटी येथे उपजिल्हा रुग्णालय, अत्याधुनिक कृषी उत्पन्न बाजार समिती, अद्यावत राईस निर्मिती प्लांट अशा विविध योजनांची निर्मितीला सुरुवात होणार आहे.

महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियानाअंतर्गत ३१ कोट २८ लाख रुपयांचा प्रोजेक्ट असून त्यात फिल्टर प्लांट, १० जलकुंभ, शहरातून नळ वितरण वाहिन्या अशा योजनेचे काम लवकरच पूर्ण होणार आहे. इगतपुरीलगत पंचतारांकित हॉटेल्स, नॅचरोपॅथी सेंटर उभारणीला सुरुवात होणार असून कित्येक दिवसांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लागणार आहेत.

तालुक्यात प्रमुख ६ धरणे असल्याने शेती व्यवसाय मोठ्या प्रमाणात अत्याधुनिक दृष्टीने सक्षम होत चालला आहे. परंपरागत भात शेती करणारे शेतकरी आता नवतंत्रज्ञानाने उज्ज्वल शेती व्यवसायाकडे वळले आहेत. अशा विविध उद्योगाची सांगड तालुका एका उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल करीत असून पाच वर्षात तालुक्याचा कायापालट अधिक जलद गतीने होणार हे नक्की असून महाराष्ट्रातील विविध उद्योगातील इगतपुरी तालुका एक रोल मॉडेल ठरणार यात शंका नाही.

Web Title: Igatpuri taluka on the path of development ....

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.