इगतपुरीत एकाच पिंजऱ्यात अडकले बिबट्याचे दोन बछडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2021 01:17 AM2021-11-25T01:17:35+5:302021-11-25T01:18:02+5:30
इगतपुरी शहरातील शिवाजीनगर परिसरात बुधवारी (दि.२४) पहाटेच्या दरम्यान दोन बिबट्याचे बछडे जेरबंद करण्यात इगतपुरीच्या प्रादेशिक वन परिक्षेत्र कार्यालयाला यश आले आहे.
इगतपुरी : शहरातील शिवाजीनगर परिसरात बुधवारी (दि.२४) पहाटेच्या दरम्यान दोन बिबट्याचे बछडे जेरबंद करण्यात इगतपुरीच्या प्रादेशिक वन परिक्षेत्र कार्यालयाला यश आले आहे.
पंधरा दिवसांपूर्वी २ बिबट्यांना पिंजऱ्यात जेरबंद केल्यानंतर पुन्हा येथील नागरिकांना रात्रीच्या बिबट्याचे बछड्याचे दर्शन झाले होते. तसेच दोन श्वानांवर हल्ले केले असल्याची माहिती तेथील नागरिकांनी वनविभागाला कळवली होती. पंधरा दिवसांपूर्वी बिबट्याची मादी व बछडा जेरबंद करण्यात आला होता. मात्र बछडे याच भागात फिरत असल्याने पिंजरा लावण्यात आला होता. मंगळवारी (दि.२३) पहाटे अचानक भक्ष्य करण्यासाठी हे दोन बछडे याचा परिसरात आले असता एकाच पिंजऱ्यात ते अडकल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. इगतपुरीचे वन परिक्षेत्र अधिकारी केतन बिरारीस यांच्या मार्गदर्शनाखाली वन परिमंडळ अधिकारी भाऊसाहेब राव, वनरक्षक फैजअली सय्यद, मुज्जू शेख आदींच्या पथकाने ही कामगिरी केली.
इन्फो
बघ्यांची गर्दी
गेल्या अनेक दिवसांपासून इगतपुरी शहर परिसरात बिबट्याच्या दहशतीने भीतीचे वातावरण पसरलेले होते. एका नागरिकावरसुद्धा बिबट्याने हल्ला केला होता. सर्व बिबटे पिंजराबंद झाल्याने नागरिकांनी वनविभागाचे आभार मानले आहेत. ही माहिती कळताच येथे बछडे पाहण्यासाठी इगतपुरी शहरातील नागरिक गर्दी होती. या वेळी येथे गर्दी केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा वन विभागाने दिला आहे.