पालिकेचे दुर्लक्ष : नाशिकवेस ते नायगाववेस व वाजे विद्यालय ते नवापूल रस्त्यांना डांबरीकरणाची प्रतीक्षा
By admin | Published: January 22, 2015 12:33 AM2015-01-22T00:33:02+5:302015-01-22T00:33:11+5:30
सिन्नर शहरातील रस्त्यांची दुरवस्था
सिन्नर : शहरातील रस्त्यांवर खड्ड्यांचे प्रमाण वाढले असून, वाहतुकीला अडथळे निर्माण होत आहे. वर्दळीच्या रस्त्यांचे रखडलेले डांबरीकरण, गटारींवरील तुटलेले ढापे, पालिकेच्या जलवाहिन्यांवरील उघडे व्हॉल्व्ह, नळजोडण्यांसाठी रस्ता खोदल्याने पडलेले खड्डे यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.
नाशिकवेस ते नायगाववेस या रस्त्याचे केवळ खडीकरण झालेले आहे. तथापि, पावसाळ्यात या रस्त्यावरील मुरुम वाहून गेल्याने मोठ्या प्रमाणात खडी उखडली गेली आहे. याठिकाणी भाजीबाजार
भरत असल्याने नागरिकांची वर्दळ असते. खडी मोकळी झाल्याने दुचाक्या अडखळणे, घसरणे आदि प्रकार घडत आहे. या रस्त्याने मोठी वाहने जात असताना चाकाखालून दगड उडून नागरिकांना इजाही झाल्या आहेत.
वाजे विद्यालय ते नवापूल रस्त्याचेही डांबरीकरण रखडल्याने दुरवस्था झाली आहे. सिन्नर बसस्थानकात उतरल्यानंतर शहरात जाण्यासाठी हा सोयीचा रस्ता असल्याने येथे नेहमी वर्दळ असते. उतार असलेल्या या रस्त्याच्या खडीकरणासाठी वापरलेला मुरुम केव्हाच खंगळून गेला आहे. खडी मोकळी झालेली असल्याने ज्येष्ठ नागरिक, बालके व दुचाकीस्वारांना या रस्त्याने प्रवास करणे कठीण ठरत आहे.
बसस्थानकाजवळील नगरपालिकेच्या शॉपिंग सेंटर जवळील गटारीचा ढापा कायम उघडा असतो. फुले पुतळ्याजवळील वळणावरील गटारीचा ढापाही तुटलेला आहे. कामगारचौक, नाशिकवेस, क्रांतीचौक, भाजीगल्ली आदि ठिकाणींही गटारी व जलवाहिन्यांच्या व्हॉल्ववरील ढापे गायब झालेले आहेत.
वावीवेशीत तर वाहन अडखळवणारा खड्डा ओलांडूनच शहरात प्रवेश करावा लागतो. याशिवाय मारुती मंदिर ते पडकीवेस, तानाजीचौक ते शिवाजीचौक, नवापूल ते शिवाजीचौक, शिंपीगल्ली ते लालचौक, नाशिकवेस ते लालचौक, वाजे विद्यालय ते भैरवनाथ मंदिर, शिवाजीचौक ते खडकपुरा, पोस्ट कार्यालय ते वावीवेस आदि रस्त्यांवरील कृत्रिम खड्ड्यांकडे पालिकेचे दुर्लक्ष झाले आहे. रस्त्यांवरील खड्ड्यांच्या वाढत्या संख्येमुळे रस्ते अरुंद झाले असून, वाहतूक कोंडीस कारणीभूत
ठरत आहे. (वार्ताहर)