उपेक्षा : दुरवस्थेचे ग्रहण सुटता सुटेना गोदापार्कचे अस्तित्व संपुष्टात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2018 01:05 AM2018-03-05T01:05:11+5:302018-03-05T01:05:11+5:30
नाशिक : गोदापार्क साकारण्यासाठी प्रयत्न झाले; मात्र त्यानंतर त्याच्या विकासासाठी उदासीनता दाखविल्याने गोदाकाठालगत साकारण्यात आलेल्या गोदापार्कचे अस्तित्व संपुष्टात आले आहे.
नाशिक : गोदापार्क साकारण्यासाठी प्रयत्न झाले; मात्र त्यानंतर त्याच्या विकासासाठी महापालिका प्रशासनाने उदासीनता दाखविल्याने गोदाकाठालगत साकारण्यात आलेल्या गोदापार्कचे अस्तित्व संपुष्टात आले आहे. शासनाच्या रोपवाटिकेपासून सुरू होणारा गोदापार्क थेट केटीएचएम महाविद्यालयाच्या बोटक्लबपर्यंत आहे; मात्र या गोदापार्कची दुरवस्था झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. गोदापार्कच्या विकासासाठी महापालिकेच्या सत्ताधारी पक्षाकडून प्रयत्न होणे गरजेचे असताना त्याबाबत दुर्लक्ष केले जात असल्याने गोदापार्क लयास गेल्याचे चित्र आहे. महापालिकेत मनसेची सत्ता असताना राज ठाकरे यांनी हा जुना गोदापार्क विकसित करण्याऐवजी खासगी विकासकामार्फत चांदशी-मखमलाबाद रस्त्यालगत गोदाकिनारी नवा गोदापार्क विकसित केला; मात्र पुरामध्ये तोदेखील वाहून गेला. आता केवळ त्या ठिकाणी गोदापार्कचे अवशेष शिल्लक राहिले आहे. त्यावेळीही जुन्या गोदापार्कची ‘नवनिर्माण’ करण्याची मागणी जोर धरू लागली होती, मात्र त्याकडे दुर्लक्ष करणे तत्कालीन सत्ताधाºयांनी पसंत केले. सध्या दोन्ही गोदापार्कची दुरवस्था कायम असून, गतवैभव पुन्हा नजरेस पडणार का? असा प्रश्न नाशिककरांकडून उपस्थित केला जात आहे. गोदापार्कमधील पथदीपांची दुर्दशा तसेच बाकांची व ओट्यांची झालेली पडझड, अस्वच्छता, उखडलेला पेव्हरब्लॉकचा रस्ता अशा एक ना अनेक समस्यांचे जुन्या गोदापार्कला ग्रहण लागले आहे. बकाल अवस्था प्राप्त झाल्याने चांगल्या सुशिक्षित नागरिकांनी या गोदापार्ककडे पाठ फिरविली असून मद्यपी, नशेबाज लोकांचे आश्रयस्थान बनले आहे. यामुळे गोदापार्क असून अडचण नसून खोळंबा अशी स्थिती निर्माण झाली आहे.