पशु लसीकरणाकडे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 08:43 PM2021-05-18T20:43:47+5:302021-05-19T00:39:25+5:30
चांदोरी : कोरोना लसीकरण सुरू असताना आता जनावरांच्या विविध आजारांवरील लसीकरण सुरू झालेले आहे. मात्र, त्याकडे फारसे लक्ष दिले ...
चांदोरी : कोरोना लसीकरण सुरू असताना आता जनावरांच्या विविध आजारांवरील लसीकरण सुरू झालेले आहे. मात्र, त्याकडे फारसे लक्ष दिले जात नसल्याचे चित्र ग्रामीण भागात पाहावयास मिळत आहे.
दरवर्षी मे-जूनमध्ये घटसर्प, फऱ्या आदींसाठी राज्य शासनाच्यावतीने लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणात राबविली जाते. मात्र, कोरोनाचा वाढता संसर्ग व लॉकडाऊनची परिस्थिती पाहता जनावरांच्या लसीकरणाला अल्प प्रतिसाद मिळत आहे. पशुपालक व शेतकऱ्यांनी आपल्या जनावरांचे लसीकरण करून घेणे गरजेचे आहे, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाच्यावतीने केले जात आहे.
वातावरण बदलाचा फटका जनावरांनाही बसतो. पावसाळ्यापूर्वी ऑक्टोबर-नोव्हेंबर व मे-जूनमध्ये लसीकरण केले जाते. पावसाळ्यात हिरव्या चाऱ्यातून जनावरांना घटसर्प, फऱ्या आदी रोगांची लागण मोठ्या प्रमाणात होते. या आजारात जनावरांना ताप येणे, तोंडात फोड येणे, पायाला जखमा होणे आदी त्रास होतो. वेळीच उपचार झाला नाही तर जनावरे दगावण्याची शक्यता अधिक असते. यासाठी राज्य शासनाच्यावतीने पावसाळा सुरू होण्यापूर्वी जनावरांना लसीकरण केले जाते.
गाय व म्हैस, शेळ्या-मेंढ्या, कोंबड्यांनाही लसीकरण दिले जाते. साधारणतः महिन्याभरात ते पूर्ण करणे अपेक्षित असते. मात्र, निफाड तालुक्यात असलेल्या पशूसंख्येच्या तुलनात्मक लसीकरण अतिशय कमी आहे नागरिकांनी जवळच्या पशुचिकित्सालयाशी संपर्क साधावा व लसीकरणाबाबत माहिती घेऊन पशूंचे लसीकरण करून घ्यावे.
निफाड तालुक्यात असलेले पशुधन बघता फऱ्या, घटसर्पचे लसीकरण अतिशय कमी असल्याने त्यावर पशुसंवर्धन विभागाच्यावतीने जनजागृती करण्यात येत आहे व सर्व पशुपालकांनी आपल्या जनावरांचे लसीकरण करून घ्यावे.
- डॉ. सुनील अहिरे, निफाड तालुका पशुसंवर्धन अधिकारी.
दुभत्या जनावरांच्या किमती लाखाच्या घरात गेल्या आहेत. यासाठी लसीकरण महत्त्वाचे असून पशुसंवर्धन विभागाने केलेल्या आवाहनाला साथ देत लसीकरण करून घ्यावे.
- हृषिकेश ठाणगे, पशुपालक, चितेगाव.
निफाड तालुक्यातील पशुधन
गाई म्हैस - १००४८४
शेळ्या/ मेंढ्या - ३०८८२
कोंबड्या गावठी - ३८१०५
कोंबड्या बॉयलर - ११९८२७४
मागील वर्षी झालेले लसीकरण
घटसर्प - ७३००
फऱ्या। - ७७००
घटसर्प फऱ्या - ३०९०० .