घंटागाडी, पथदीप समस्यांकडे दुर्लक्ष
By admin | Published: August 27, 2016 12:16 AM2016-08-27T00:16:10+5:302016-08-27T00:16:54+5:30
प्रभाग सभा : लोकप्रतिनिधी संतप्त
पंचवटी : गेल्या अनेक महिन्यांपासून घंटागाडी अनियमित येत असल्याची तक्र ार करूनही प्रशासनाला जाग येत नाही. पथदीपांसाठी पोल उभारलेली मात्र त्यावर फिटिंग नाही. प्रशासनाला वारंवार विचारणा करूनही समाधानकारक उत्तर मिळत नसल्याने लोकप्रतिनिधींनी प्रभाग बैठकीत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
प्रभाग सभापती रूचि कुंभारकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ११ लाख रुपयांच्या कामांना मंजुरी देण्यात आली. पंचवटी विभागात घंटागाडी कधीच वेळेत येत नाही. उशिराने घंटागाडी येत असल्याची तक्र ार रंजना भानसी यांनी केली. औरंगाबादरोडवर पथदीपांसाठी पोल उभारून अडीच वर्षांचा कालावधी लोटला मात्र अद्याप फिटिंग बसविलेल्या नाही. विद्युत विभागाने फिटिंग बसवाव्यात किंवा पोल काढून घ्यावे व जे नुकसान झाले त्याचा खर्च अधिकाऱ्यांच्या पगारातून वसूल करावा, असे उद्धव निमसे यांनी सांगितले.
इंदिरा गांधी रुग्णालयात स्त्रीरोग तज्ज्ञांची संख्या वाढविणे, विद्युत विभागाच्या समस्या व विकासकामांसाठी विभागीय अधिकाऱ्यांना निधी वाढवून देण्याबाबत ठराव करून आयुक्तांची भेट घेणार असल्याचे उपमहापौर गुरमित बग्गा यांनी सांगितले. इंदिरा गांधी रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना अत्यावश्यक सेवा मिळत नसल्याची तक्र ार नागरिक करत असल्याने प्रशासनाने दखल घ्यावी, असे डॉ. विशाल घोलप यांनी सांगितले. यावेळी झालेल्या चर्चेत सुनीता शिंदे, ज्योती गांगुर्डे, शालिनी पवार, फुलावती बोडके, रूपाली गावंड, सिंधू खोडे, परशराम वाघेरे, विभागीय अधिकारी अशोक वाघ, राहुल खांदवे, संजय गोसावी, वसंत ढुमसे, आर. एम. शिंदे आदिंनी सहभाग घेतला. (वार्ताहर)