मास्क वापराकडे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:25 AM2021-03-04T04:25:24+5:302021-03-04T04:25:24+5:30
वाढत्या गुन्हेगारीकडे पोलिसांचे दुर्लक्ष नाशिक : शहर परिसरात वाढती गुन्हेगारी राखण्यास पोलिसांना अपयश येत असल्याने सर्वसामांन्य नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त ...
वाढत्या गुन्हेगारीकडे पोलिसांचे दुर्लक्ष
नाशिक : शहर परिसरात वाढती गुन्हेगारी राखण्यास पोलिसांना अपयश येत असल्याने सर्वसामांन्य नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. वाढत्या गुन्हेगारीमुळे शहरात दररोज गुन्हेगारी स्वरूपाच्या वेगवेगळ्या घटना घडत आहेत. भुरट्या चोऱ्यांचे प्रमाणही वाढले आहे. यामुळे नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.
पथदीप बंद असल्याने गैरसोय
नाशिक : शहरातील अनेक मार्गांवरील पथदीप बंद असल्यामुळे रात्रीच्या वेळी या परिसरात अंधार असतो. यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. दुचाकीस्वारांना विशेष त्रास सहन करावा लागतो. अनेक वेळा समोरचे दिसत नसल्याने छोटेमोेठे अपघात होतात. महापालिकेने पथदीपांची दुरुस्ती करावी अशी मागणी करण्यात येत आहे.
भाजीबाजारामुळे वाहतुकीस अडथळा
नाशिक : जुना सायखेडा रोडवर भाजीबाजारामुळे वाहतुकीस मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होतो. हा रस्ता अरुंद असून त्यात भाजीविक्रेत्यांची दुकाने आणि ग्राहकांच्या गाड्या यामुळे वाहतुकीचा खोळंबा होतो. वारंवार मागणी करूनही याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.
कमी केलेल्या आरोग्य केलेल्या कर्मचाऱ्यांची भटकंती
नाशिक : कोरोना काळात भर्ती केलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना महापालिकेने कमी केल्यामुळे या कर्मचाऱ्यांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे. अनेक कर्मचाऱ्यांची काम मिळविण्यासाठी भटकंती सुरू आहे. मनपाने या कर्मचाऱ्यांना कायम करण्याची मागणी करण्यात येत आहे.
हॉटेल चालकांना ग्राहकांची प्रतीक्षा
नाशिक : लॉकडाऊननंतर हॉटेल सुरू झाले असले तरी अद्याप महामार्गावरील अनेक हॉटेल चालकांना ग्राहकांची प्रतीक्षा आहे. कोरोनाच्या भीतीमुळे अनेक नागरिक अजूनही हॉटेलमध्ये जेवणापेक्षा घरूनच डबा घेऊन निघतात. यामुळे हॉटेल व्यावसायिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.
डिझेल वाढल्याने महागाईचा भडका
नाशिक : पेट्रोल, डिझेलच्या किमती वाढल्याने वाहतूकदारांना मालवाहतुकीचे दर वाढविले आहेत, यामुळे महागाईचा भडका उडाला आहे. यामुळे सर्वसामान्यांचे आर्थिक बजेट कोलमडले असून अनेकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. केंद्र शासनाने पेट्रोल, डिझेलच्या किमती कमी कराव्यात अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
शहरात मनपा निवडणुकांची चर्चा
नाशिक : शहरातील विविध भागांमध्ये आगामी महापालिका निवडणुकांची चर्चा रंगू लागली आहे. अनेक इच्छुकांनीही आपल्या संपर्क अभियानाला प्रारंभ केला असून आपल्या प्रभागातील कार्यकर्त्यांच्या बैठका घेण्यात येत आहेत. नवीन भागात आपले कार्यकर्ते तयार करण्यावरही भर दिला जात आहे. यामुळे चौकाचौकात निवडणुकांची चर्चा रंगू लागली आहे.