ग्रामीण भागात कोरोनाकडे दुर्लक्ष, विवाह सोहळ्यांना गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2020 04:09 AM2020-12-28T04:09:02+5:302020-12-28T04:09:02+5:30
जळगाव निंबायती : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनलॉकमध्ये प्रतिबंधात्मक उपाय म्हणून शासनाने लग्नसमारंभासाठी नियमावली तयार केली असली तरी ग्रामीण भागात लग्नातील ...
जळगाव निंबायती : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनलॉकमध्ये प्रतिबंधात्मक उपाय म्हणून शासनाने लग्नसमारंभासाठी नियमावली तयार केली असली तरी ग्रामीण भागात लग्नातील वाढती गर्दी कोरोनाला आयते निमंत्रण ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
तुळशी विवाहानंतर लग्नसराईला प्रारंभ झाला. गतवर्षी लॉकडाऊनमुळे अनेकांवर ठरलेले लग्न पुढे ढकलण्याची वेळ आली होती. मात्र सध्या विवाह सोहळ्यांमधील व-हाडी मंडळींचा उत्साह व वाढती गर्दी चिंतेचा विषय बनला आहे. लाॅकडाऊन उठवल्यानंतर लोक बिनधास्त बाहेर फिरताना दिसत आहेत. मास्क आणि शारीरिक अंतराबाबत शासनाच्या सूचनांकडे नागरिकांकडून दुर्लक्ष केले जात असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यातच कोरोनाची लक्षणे दिसत असतानादेखील चाचणी करून न घेणे तसेच याबाबत प्रशासनाला न कळविणे असे प्रकार वारंवार घडत आहेत. त्यातच शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागातील विवाह सोहळ्यांकडे प्रशासनाचे होत असलेले दुर्लक्ष हे आगामी काळात कोरोनावाढीचे एक कारण होऊ शकते.
इन्फो...
शासनाची नियमावली कागदावरच...
लग्नसमारंभाला उपस्थित राहणाऱ्या लोकांची मर्यादा ५० वरून आता १०० करण्यात आली आहे. त्यात वधू-वर दोन्ही पक्षाकडील नातेवाईक मंडळींसह वाजंत्री, भटजीपासून आचारी आणि मदतनीस या सगळ्यांची गणना करून १०० संख्या निर्धारित करण्यात आली आहे. तसेच उपस्थित राहणाऱ्या लोकांची यादी लग्न सोहळ्यापूर्वी स्थानिक पोलीस ठाण्यात देण्याची अट घालण्यात आली असून, लग्न झाल्यावर त्याच्या चित्रीकरणाची सीडी पोलीस ठाण्यात जमा करावी लागणार आहे. समारंभाला येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे नाव मोबाइल नंबर आणि स्वाक्षरी घेण्याचे बंधन घालण्यात आले असून, उपस्थितांचे निर्जंतुकीकरण करून शरीरातील तपमान मोजणारी यंत्रणा प्रवेशद्वारावरच उपलब्ध करून देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शिवाय लग्नाच्या पंक्तीत प्रत्येकी सहा फुटांवर खुणा करण्यात याव्यात. जेवण करताना मास्क काढल्यावर जेवणाऱ्यांनी एकमेकांशी गप्पा मारू नयेत. ग्रामीण भागातील लग्न सोहळ्यावर नजर ठेवण्यासाठी पोलीस, ग्रामसेवक, तलाठी आणि पोलीस पाटील यांची भरारी पथके नेमण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेली आहे; मात्र हे सर्व नियम धाब्यावर बसवून लग्न सोहळ्यात मोठी गर्दी होत असल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे.
इन्फो...
अनलॉकनंतर नागरिकांमध्ये कोरोनाबाबत पूर्वीसारखी भीती राहिलेली नाही आणि त्यामुळेच कोरोनापासून बचाव करण्यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांबाबत नागरिकांमध्ये उदासीनता आहे. अनेक लोक स्वतःच्या जीवाची पर्वा न करता लग्नसमारंभासाठी घराबाहेर पडत आहेत. मास्क का लावायचा, हेच अनेकांना अजून माहीत नाही. तसेच मास्क योग्य प्रकारे हाताळला जात नाही. कोरोना झाल्यानंतर समाज आपल्यावर बहिष्कार टाकेल या भीतीने लक्षणे दिसत असताना चाचणी केली जात नाही, तसेच अंगावर आजार काढला जातो. त्यामुळे त्यांच्यापासून घरातील इतर सदस्यांना लागण होण्याचे प्रमाण अधिक आहे.
- डॉ. दीपक नरोटे जळगाव निंबायती