झोडगेत दारूबंदीच्या मागणीकडे दुर्लक्ष
By admin | Published: January 14, 2016 10:09 PM2016-01-14T22:09:26+5:302016-01-14T22:31:20+5:30
महिलावर्गात तीव्र संताप; निवेदनांना केराची टोपली
झोडगे : झोडगेतील महिला गेल्या अनेक दिवसांपासून वारंवार दारूबंदीची मागणी करीत असून, संबंधित वरिष्ठ अधिकारी त्याकडे ‘सर्रास’ डोळेझाक करीत असल्याने झोडगेत दारूबंदी होणार की नाही, याबाबत महिलावर्ग साशंक आहे.
येथे दारूबंदीची अनेक दिवसांपासूनची मागणी आहे. सर्व संबंधितांना अनेक वेळा निवेदने दिली. याबाबत नंतर काय कार्यवाही होते हे जरी गुलदस्त्यात राहत असले, तरी दारूच्या दुष्परिणामांची जाणीव असणाऱ्या महिला भगिनींकडून मात्र गावात दारूबंदीचा आवाज उठवला जातो, त्याला सर्वांचा उत्स्फूर्त पाठिंबाही मिळतो; मात्र प्रशासन व ग्रामस्थ याचा सोयीस्कर वापर करून घेत असल्याने झोडगेत दारूबंदी म्हणजे सध्या ‘मृगजळ’च ठरत असल्याचे दिसून येत आहे. मागील महिन्यात दुष्काळ पाहणी दौऱ्यानिमित्त झोडगेत आलेले भिवंडीचे आमदार शांताराम मोरे यांनाही पुन्हा एकदा दारूबंदीचे निवेदन सरपंच मालती नेरकर व ग्रामपंचायतच्या महिला सदस्यांच्या हस्ते देण्यात आले व दारूबंदीची मागणी करण्यात आली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य वैशाली देसाई यांनी अगदी लहान मुलेही दारूचे व्यसन करत असल्याचे नमूद केले. पूर्वाश्रमीचे बंद पडलेले देशी दारूचे दुकान पुन्हा सक्रिय होऊन पिणाऱ्यांना सरकारी दरातील व विना भेसळीची दारू मिळू लागली. गेल्या अनेक दिवसांपासून भेसळीची व निकृष्ट दर्जाची दारू चढ्या भावाने त्यांना घ्यावी लागत होती. वाऱ्याची दिशा बघून धंदा बंद/चालू करण्यात वाकबगार असणाऱ्यांना प्रशासनाचे भय कधी वाटलेच नाही. तीच परिस्थिती महामार्गावरची. भाव जास्त द्यावा लागेल पण सहज उपलब्ध होईल अशा पद्धतीने सर्रास अनधिकृतपणे दारू विक्री सुरू आहे ती कोणाच्या आशीर्वादाने, असा प्रश्न विचारला जात आहे.