हॉटेल्समध्ये बेकायदा बिअरबार सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2019 01:29 AM2019-01-22T01:29:03+5:302019-01-22T01:29:21+5:30
आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या नांदूर, मानूर, आडगाव, औरंगाबादरोड परिसरात असलेल्या अनेक हॉटेल्स व ढाब्यांवर गेल्या काही महिन्यांपासून खुलेआम मद्यविक्री केली जात असल्याने हॉटेल्स व ढाब्यांवर दैनंदिन रात्रीच्या सुमाराला मद्यपींची शाळा भरू लागली आहे.
पंचवटी : आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या नांदूर, मानूर, आडगाव, औरंगाबादरोड परिसरात असलेल्या अनेक हॉटेल्स व ढाब्यांवर गेल्या काही महिन्यांपासून खुलेआम मद्यविक्री केली जात असल्याने हॉटेल्स व ढाब्यांवर दैनंदिन रात्रीच्या सुमाराला मद्यपींची शाळा भरू लागली आहे. विशेष म्हणजे अनधिकृतपणे मद्यविक्री करणाऱ्या हॉटेल्स तसेच ढाबेचालक यांच्यावर कारवाईचे धाडस केले जात नसल्याचे उघडपणे बोलले जात आहे. आडगाव पोलिसांची कारवाई शून्य असल्याने हॉटेल्स तसेच ढाब्यांनादेखील खुल्या बिअरबारचे स्वरूप प्राप्त झाले आहे. आडगाव शिवारात अनेक हॉटेल्स तसेच ढाबे असून, रात्री उशिरापर्यंत ते सुरू राहतात. यातील अनेक हॉटेल्स तसेच ढाब्यांवर देशी व विदेशी मद्य परवानगी नसतानादेखील विक्री केले जाते.
गेल्या अनेक महिन्यांपासून विनापरवाना मद्यविक्री केली जात असल्याने शेकडो मद्यपी मध्यरात्रीपर्यंत बसलेले असतात. गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या खुल्या बिअरबार विरुद्ध आडगाव पोलीस कारवाई करणार का? की खुद्द पोलीस आयुक्तांना याबाबत दखल घ्यावी लागणार, अशी चर्चा नागरिक करू लागले आहेत.
‘अर्थपूर्ण’ संबंध
आडगाव शिवारात असलेल्या हॉटेल्स तसेच ढाब्यांवर खुलेआमपणे मद्यविक्री केली जाते. विशेष म्हणजे ढाबेचालक आणि आडगाव पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी विशेषत: ‘वसुली’ अधिकाºयांचे अर्थपूर्ण संबंध प्रस्थापित झाल्याने हॉटेल तसेच ढाब्यांवर मद्यविक्री तसेच मद्यपींना मद्यप्राशन करून देण्यासाठी बसू दिले जाते, असे काही हॉटेल्स व ढाबेचालकांनी नाव न सांगण्याच्या अटीवर बोलून दाखविले आहे.