ममदापूर शिवारात ११ लाखांचा अवैध गांजा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2022 01:03 AM2022-01-29T01:03:34+5:302022-01-29T01:03:51+5:30
येवला तालुक्यातील ममदापूर शिवारात पोलीस अधिकाऱ्यांसह तहसीलदार यांनी छापा मारून ११ लाख १० हजार ४५० रुपये किमतीचा अवैध गांजा, गांजाची झाडे व इतर साहित्यासह एकास अटक केली.
येवला : तालुक्यातील ममदापूर शिवारात पोलीस अधिकाऱ्यांसह तहसीलदार यांनी छापा मारून ११ लाख १० हजार ४५० रुपये किमतीचा अवैध गांजा, गांजाची झाडे व इतर साहित्यासह एकास अटक केली.
मनमाड उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी समीरसिंह साळवे, तहसीलदार प्रमोद हिले, पोलीस निरीक्षक अनिल भवारी, सहायक पोलीस निरीक्षक उज्ज्वालसिंग राजपूत, पोलीस उपनिरीक्षक दिनेश सूर्यवंशी, सहायक पोलीस उपनिरीक्षक अल्ताफ शेख, बी. जे. पारखे, पोलीस हवालदार एम. एम. सानप, पोलीस नाईक एस. डी. पवार, ए. बी. पिसाळ, जी. बी. मोरे, चालक पंडित गडाख आदींच्या पथकाने गुरुवारी (दि. २७) ही कारवाई केली. ममदापूर शिवार शेत गट नंबर ४६७ मध्ये देवीदास रामचंद्र सोनवणे (३०, रा. ममदापूर, ता. येवला) याने शेतात कांदा पिकामध्ये गांजा हा मनोव्यवहारावर परिणाम करणारा गुंगीकारक अमली पदार्थाची १०५ झाडे लावून त्यांचे संगोपन केले. त्याच्याकडून १०५ गांजाची झाडे वजन १५० किलो, तसेच वाळविलेला गांजा वजन ३० किलो ८७० ग्रॅम व ओला गांजा वजन १० किलो ४०० ग्रॅम तसेच गांजा विक्रीची साहित्य साधने असा एकूण ११ लाख १० हजार ४५० रुपये किमतीचा माल मिळून आला. सोनवणे याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यास अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सूर्यवंशी करीत आहेत.