चंदनपुरी शिवारातून अवैध मद्यसाठा जप्त
By admin | Published: May 22, 2017 01:10 AM2017-05-22T01:10:29+5:302017-05-22T01:10:40+5:30
मालेगाव : चंदनपुरी शिवारातून विनापरवाना ५० हजार रुपये किमतीच्या विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्या नगरसेवकासह तिघाना पोलीस पथकाने अटक केली आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
मालेगाव : शहरालगतच्या चंदनपुरी शिवारातून विनापरवाना अवैधरीत्या ५० हजार ४०० रुपये किमतीच्या विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्या सटाणा येथील भाजपा नगरसेवकासह तिघा जणांना पोलीस उपअधीक्षक यांच्या पथकाने अटक केली आहे. पोलिसांनी मद्यसाठा व वाहन असा एकूण पाच लाख ५० हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
शहरालगतच्या चंदनपुरी गावाकडून नामांकित कंपनीची विदेशी दारूची वाहतूक होत असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक अजित हगवणे यांच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार पोलीस उपअधीक्षक हगवणे, पोलीस हवालदार भूषण खैरनार, संजय गुरव, दीपक वानखेडे, दत्तू देवरे आदिंच्या पथकाने चंदनपुरी शिवारात सापळा रचला होता. यावेळी चंदनपुरी गावाकडून येणाऱ्या चारचाकी कारची (क्र. एमएच १५ एफएफ १६०६) तपासणी केली असता या गाडीत नामांकित कंपनीच्या ५० हजार ४०० रुपये किमतीच्या ३३६ बाटल्या आढळून आल्या. सदर मद्यसाठ्याची विनापरवानगी वाहतूक करणारे भाजपाचे सटाण्याचे नगरसेवक दीपक केदा पाकळे, तसेच पंकज भास्कर येवला (रा. सटाणा), चित्तरंजन मोतीराम नंदाळे, रा. निमगाव (ता. मालेगाव), तुकाराम सीताराम पिंपळसे, रा. मळगाव (ता. सटाणा) या चौघांना अटक करण्यात आली आहे. या चौघांविरुद्ध किल्ला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास पोलीस करीत आहेत.