जिल्ह्यात सव्वादोन लाखांची अवैध दारू जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 12:51 AM2019-03-15T00:51:30+5:302019-03-15T00:52:54+5:30
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जारी झाल्यानंतर गेल्या चार दिवसांत राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्ह्यात अवैध मद्यविक्रीच्या विरोधात मोहीम उघडली असून, सुमारे सव्वादोन लाख रुपये किमतीची हजारो लिटर दारू व वाहने जप्त करण्यात आली आहेत.
नाशिक : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जारी झाल्यानंतर गेल्या चार दिवसांत राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्ह्यात अवैध मद्यविक्रीच्या विरोधात मोहीम उघडली असून, सुमारे सव्वादोन लाख रुपये किमतीची हजारो लिटर दारू व वाहने जप्त करण्यात आली आहेत. याप्रकरणी जिल्ह्यात गेल्या चार दिवसांत ३५ गुन्हे दाखल करण्यात येऊन ३१ आरोपींना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, गुरुवारी सकाळी मुंबई-आग्रारोडवर गावठी दारूची वाहतूक करणारी रिक्षा ताब्यात घेऊन ४५० लिटर गावठी दारू जप्त करण्यात आली आहे.
गुरुवारी सकाळी इगतपुरीकडून नाशिकडे येणारी रिक्षा (एम. एच. १५ झेड ९०६७) अडवून भरारी पथकाने तपासणी केली असता, त्यात सुमारे ४५० लिटर गावठी दारू भरलेले १८ प्लॅस्टिकच्या टाक्या आढळून आल्या. निरीक्षक संतोष चोपडेकर, दुय्यम निरीक्षक जयराम जाखेरे यांनी सदरची रिक्षा ताब्यात घेऊन दारूची वाहतूक करणारा सरताज रमेश रोकडे, रा. समतानगर, आगरटाकळी यास अटक केली आहे. बुधवारीदेखील पथकाने अंबड औद्योगिक वसाहतीत व चुंचाळे परिसरात गस्त घालत असताना देशीदारूची अवैध वाहतूक करणारी कार पकडली. सदरची कारवाई उत्पादन शुल्क खात्याचे अधीक्षक चरणसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक मधुकर राख, दुय्यम निरीक्षक प्रवीण मंडलिक, जवान विलास कुवर, सुनील पाटील, विरेंद्र वाघ, विष्णू सानप, पूनम भालेराव, रतिलाल पाटील, धनराज पवार आदींनी पार पाडली आहे.
संशयित साबळे याला अटक
कारमध्ये देशी दारूच्या ३८८ बाटल्या जप्त करण्यात आल्या. पथकाने मारुती कारसह सुमारे ६७ हजार ५७६ रुपये किमतीचा मुदेमाल जप्त केला असून, संशयित वैभव बाळू साबळे, यास ताब्यात घेतले आहे. आचारसंहिता लागू झाल्यापासून ५८१ गावठी दारू, १७०० लिटर रसायन, २१९ लिटर देशी दारू, १५० लिटर ताडी असा मुद्देमाल जप्त केला आहे.