येवल्यात अवैध मद्यसाठा जप्त
By admin | Published: September 17, 2016 12:03 AM2016-09-17T00:03:38+5:302016-09-17T00:04:02+5:30
तालुका पोलीस : तीन लाख ८२ हजार रु पयांचा मुद्देमाल जप्त
येवला : तालुक्यातील कोळम खुर्द ते रहाडी चौफुलीदरम्यान विनापरवाना देशी मद्यासह वाहतूक करणारी पिकअप येवला तालुका पोलिसांनी जप्त केली. पोलिसांचा सुगावा लागताच चालकांसह तिघे फरार झाले. पोलिसांनी गाडीसह तीन लाख ८२ हजार रुपयांचा ऐवज ताब्यात घेतला आहे.
येवला तालुक्यातील कोळम खुर्द ते रहाडीदरम्यान विनापरवाना देशी मद्याची वाहतूक होत असल्याची खबर येवला तालुका पोलीस निरीक्षक रुपचंद वाघमारे यांना मिळाली होती. पोलीस निरीक्षक वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने सापळा रचून गुरुवारी सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास मिळालेल्या माहितीप्रमाणे पिकअप गाडी (क्र .एमएच २० डीई १८४४) त्यांना येताना दिसली. पोलिसाचा ताफा दिसताच गाडी रस्त्यावरच थांबवून चालकासह तिघांनी पलायन केले. पोलिसांनी गाडीकडे धाव घेऊन तपासणी केली असता गाडीमध्ये खाकी रंगाचे बॉक्स आढळले. या घटनेत पोलिसांनी देशी मद्याचे ५८ सीलबंद खोके व ५ फुटलेले मद्याचे खोके ताब्यात घेतले.
यामध्ये एक लाख ३२ हजार रुपये किमतीच्या २७८४ बाटल्या आढळून आल्या. तसेच ५ फुटलेल्या खोक्यांमधील बाटल्यांची संख्या समजू शकलेली नाही. गणेश विसर्जनाच्या दिवशी दारू विक्री बंद ठेवण्याचे शासनाचे आदेश असतानाही हा सर्व माल अवैधरीत्या विक्र ीसाठी नेत असल्याचे पोलिसांनी सांगितले. (वार्ताहर)