अवैध दारू वाहतूक प्रकरणी अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2017 01:34 AM2017-07-25T01:34:15+5:302017-07-25T01:34:29+5:30
सिन्नर : नाशिक - पुणे महामार्गावर बोलेरो जीपमधून अवैध दारूची वाहतूक करणाऱ्या दोघा संशयिताना वावी पोलिसांनी अटक केली
लोकमत न्यूज नेटवर्क
सिन्नर : नाशिक - पुणे महामार्गावर बोलेरो जीपमधून अवैध दारूची वाहतूक करणाऱ्या दोघा संशयिताना वावी पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्याकडून सुमारे ९१ हजार रुपये किमतीच्या देशी व विदेशी दारूच्या बाटल्यांसह बोलेरो जीपही ताब्यात घेतली आहे. सहायक पोलीस निरीक्षक रणजित आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक-पुणे महामार्गावर वावी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नांदूरशिंगोटे दूरक्षेत्रातील पोलीस कर्मचाऱ्यांनी ही कामगिरी केली. पोलीस हवालदार पी.के. अढांगळे, ए.के. जगधने, प्रकाश उंबरकर, यू.एस. खेडकर, डी. बी. दराडे हे नांदूरशिंगोटे - सिन्नर रस्त्यावर शनिवारी रात्री दीड वाजेच्या सुमारास गस्त घालत असताना गर्जे पेट्रोलपंपाजवळ बोलेरो जीप संशयितरीत्या उभी असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी जीपची तपासणी केली असता त्यात देशी व विदेशी दारूचे बॉक्स आढळून आले. पोलिसांनी गणेश बबन रोडे (३५), रा. पळसे व कुणाल नाना महापुरे (३५), रा. हिरावाडी, नाशिक या संशयितांना ताब्यात घेतले असून, जीपमधील बॉबी संत्रा देशी दारूच्या १०५६ बाटल्या, मॅकडॉल-९६ बाटल्या, बिअरच्या २४ बाटल्या असा ९१ हजार ७५२ रुपयांचा माल जप्त केला. त्याचबरोबर चार लाख रुपये किमतीची बोलेरो जीप जप्त करण्यात आली आहे. सहायक पोलीस निरीक्षक रणजित आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मुख्तार सय्यद, पी. के. अढांगळे अधिक तपास करीत आहेत.