६.५० लाखांचा अवैध मद्यसाठा जप्त
By admin | Published: February 3, 2017 12:51 AM2017-02-03T00:51:29+5:302017-02-03T00:51:42+5:30
राज्य उत्पादन शुल्क : भरारी पथकाची कामगिरी; पाच ठिकाणी छापे
नाशिक : महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणारी अवैध मद्याची वाहतूक रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने भरारी पथके तयार केली होती़ या भरारी पथकांनी बुधवार (दि़ १) ते गुरुवार (दि.२) या दोन दिवसांत पाच विविध ठिकाणी कारवाई करून ६ लाख ३२ हजार ११५ रुपयांचा अवैध मद्यसाठा जप्त केला आहे़
रिक्षाद्वारे (एमएच १५, झेड ७८४७) अवैध मद्याची वाहतूक करणारा संशयित दीपक महाले यास राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी शालिमार चौकातून बुधवारी (दि़१) ताब्यात घेतले़ त्याच्या रिक्षामध्ये ५७ हजार ३१२ रुपयांचा देशी-विदेशी मद्याच्या बाटल्या होत्या़ संशयित महाले यास अटक करण्यात आली असून, रिक्षा व मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे़ भरारी पथकाने दुसरी कारवाई त्र्यंबकेश्वर-अंबोली रस्त्यावर केली असून, एका कारमधून (एमएच १५, डीएस ९३७) ३ लाख ७४ हजार रुपयांचा देशी मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे़ याप्रकरणी संशयित अनिल चव्हाण यास अटक करण्यात आली आहे़ पंचवटीतील वाघाडी परिसरातील वाल्मीकनगरमध्ये असलेल्या घर नंबर एफ ५२ मध्ये भरारी पथकाने गुरुवारी (दि़२) छापा टाकला़ या ठिकाणी अवैध मद्य, रिकाम्या बाटल्या, प्लॅस्टिकचे बॅरेल, मद्याच्या बाटलीचे पॅकिंग मशीन, बुच तसेच बनावट मद्यासाठी लागणारा साठा व साहित्य जप्त केले़ राज्य उत्पादन शुल्क विभागाचे विभागीय उपायुक्त प्रसाद सुर्वे, पोलीस अधीक्षक आर. जी. आवळे यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय भरारी पथकांनी ही कारवाई केली आहे़ (प्रतिनिधी)