द्वारका चौकात १४ लाखांचा अवैध मद्यसाठा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2022 01:43 AM2022-05-11T01:43:45+5:302022-05-11T01:46:17+5:30
राज्यात विक्रीसाठी प्रतिबंधित असलेला व परराज्यांत निर्मित केलेल्या मद्याची अवैध वाहतूक नाशिकमार्गे धुळ्यात केली जात होती. याबाबत मिळालेल्या गोपनीय माहितीवरून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने द्वारका चौकात सापळा रचला. संशयास्पद ट्रक दिसताच पथकाने तो रोखला. ट्रकमधून सुमारे १४ लाखांचा मद्यसाठा हस्तगत करण्यात आला आहे.
नाशिक : राज्यात विक्रीसाठी प्रतिबंधित असलेला व परराज्यांत निर्मित केलेल्या मद्याची अवैध वाहतूक नाशिकमार्गे धुळ्यात केली जात होती. याबाबत मिळालेल्या गोपनीय माहितीवरून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने द्वारका चौकात सापळा रचला. संशयास्पद ट्रक दिसताच पथकाने तो रोखला. ट्रकमधून सुमारे १४ लाखांचा मद्यसाठा हस्तगत करण्यात आला आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीवरून मंगळवारी (दि.१०) द्वारकामार्गे मुंबई-्आग्रा महामार्गावरून प्रतिबंधित मद्याची मोठ्या प्रमाणावर वाहतूक केली जाणार असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पथकाने द्वारका सर्कलजवळ सापळा रचला. त्यावेळी संशयास्पद ट्रक (एम.एच ४८ टी १६२८) भरधाव येताना दिसला. पथकातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी त्वरित चालकाला थांबण्याचा इशारा केला. ट्रक थांबताच पथकाने शासकिय वाहनाने ट्रकचा रस्ता अडविला. कर्मचाऱ्यांनी चालकाला ताब्यात घेत त्याच्या ताब्यातील ट्रकची पाहणी केली असता त्यामध्ये प्रतिबंधित मद्यसाठा आढळून आला. यामध्ये परराज्यांतील १ हजार ३१० लिटर विदेशी मद्य व १ हजार२०० लिटर बिअर असा मद्यसाठा सापडला. पथकाने ट्रकचालक मोहनलाल भागीरथ बिश्नोई (३५, रा. राजस्थान) यास अटक केली आहे.
हा मद्यसाठा धुळे जिल्ह्याच्या दिशेने वाहून नेला जात होता, अशी माहिती प्राथमिकदृष्ट्या समोर आल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र, चालकाकडील सखोल चौकशीतून मद्यसाठा नाशिकमध्ये आणला होता का? याबाबत अधिक चौकशी केली जात आहे.
परराज्यांत तयार केलेला व महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला मद्यसाठा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने पकडला आहे. या कारवाईत पथकाने सुमारे १४ लाख रुपयांचा मद्यसाठा व १० लाख रुपयांचे वाहन असा एकूण २४ लाख ३८ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.