येवल्यातून ट्रकसह ९३ लाखांचा अवैध मद्यसाठा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 01:19 AM2020-12-05T01:19:15+5:302020-12-05T01:19:55+5:30
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विभागीय भरारी पथकाने येवल्यात अवैध मद्य तस्करीविरोधात कारवाई करत महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या मद्याचा साठा, ट्रक असा ९३ लाख ६३ हजार ४२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
नाशिक : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विभागीय भरारी पथकाने येवल्यात अवैध मद्य तस्करीविरोधात कारवाई करत महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या मद्याचा साठा, ट्रक असा ९३ लाख ६३ हजार ४२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
अहमदनगर टोलनाक्याजवळीत पिंपळगाव जलाल शिवारात अवैध मद्य घेऊन जाणारे वाहन येणार असल्याची गोपनीय माहिती पथकाला मिळाली होती. त्यानुसार राज्य उत्पादन विभागाच्या पथकाने सापळा रचला होता. यावेळी मनमाड रोडवर एक दहाचाकी ट्रक (क्र. एमएच ०४ डीएस २९२८) संशयास्पद आढळून आला. या ट्रकची पथकाने तपासणी केली असता त्यात महाराष्ट्रात प्रतिबंधित व हरयाणा आणि गोवा राज्यात विक्रीस परवानगी असलेल्या विविध कंपन्यांच्या वेगवेगळ्या ब्रँडच्या मद्याच्या बाटल्या आढळून आल्या. उत्पादन शुल्क विभागाने मद्यसाठा व दोन माेबाइल व ट्रक असा एकूण ९३ लाख ६३ हजार ४२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी संशयित संजय साहेबराव पाटील (३६) व काशीनाथ बुधा पाटील (४३, दोघे, रा.सालदारनगर, शहादा) यांना अटक करून त्यांच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली.
दरम्यान, गेल्या काही दिवसांमध्ये जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध मद्यसाठा आढळून येत असल्याने जिल्ह्यात मद्यतस्कारांची मोठी टोळी कार्यरत असून, त्यांच्यावर मोठ्या शक्तींचा हात असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.