अनाधिकृत भंगारातील बेकायदा वीजजोडण्याही धोकादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:16 AM2021-01-25T04:16:03+5:302021-01-25T04:16:03+5:30
वडाळा गाव परिसरात हातावर काम करणाऱ्यांची वस्ती आहेत. यात मेहबुबनगर, गुलशननगर, सादिकनगर, मुमताजनगर, सहपरिसरात नागरीकरण दिवसागणिक वाढत आहे. ...
वडाळा गाव परिसरात हातावर काम करणाऱ्यांची वस्ती आहेत. यात मेहबुबनगर, गुलशननगर, सादिकनगर, मुमताजनगर, सहपरिसरात नागरीकरण दिवसागणिक वाढत आहे. त्याचबरोबर, अण्णाभाऊ साठेनगर व मेहबूबनगर परिसरात अनधिकृत भंगार गोदामे ही वाढत आहे. सुमारे वीस वर्षांपूर्वी तीन ते चार भंगार गोदामे होती. आज त्यांची संख्या सुमारे सत्तरच्या घरात गेली आहे. या अनधिकृत भंगार गोदाम मध्ये शहरातून गोळा केलेले प्लास्टीक वितळणे, पत्रे लोखंडी कटिंग करणे, बनविण्यासाठी कटिंग मशीन, प्लास्टीक धुण्यासाठी मशीन, यासह विविध कामांसाठी विद्युत पुरवठा लागतो, परंतु काही भंगार गोदाम मालकांनी बेकायदा वीजजोडण्याही घेतल्या आहेत. त्या ठिकाणी वीजचेारीमुळे महावितरणचा महसूल बुडतोच, परंतु त्यापेक्षा महत्त्वाचे म्हणजे एखादी दुर्घटना घडली, तर दाटवस्तीमुळे अनर्थ हेाण्याची शक्यता आहे. त्यामुळे संबंधितांना सुरक्षित व अधिकृत वीजजोडण्यांची सक्ती करण्याची गरज निर्माण झाली आहे.
इन्फो..
भंगार गोदामाची वीजचोरी काही थांबेना
सुमारे वर्षभरापूर्वी अशाच प्रकारे महावितरणच्या भरारी पथकाने दोन भंगार गोदाम मालकांवर अनधिकृत वीजपुरवठा घेतल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला, तसेच लाखो रुपयांचा दंड वसूल केला. त्यानंतर, दोन दिवसांपूर्वी प्लॅस्टिक रिसायकलिंग तीन गोदामावर वीजचोरी पकडली होती. त्यानंतर, फार फरक पडलेला नाही. इतकेच नव्हे, महावितरणच्या मिनी फिल्टरमधून जमिनीखालून वायर टाकून वीजचोरी करण्यापर्यंत मजल गेली आहे.