ग्रामपंचायतीच्या ट्रॅक्टरने अवैध वाळू उपसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2021 01:13 AM2021-11-25T01:13:03+5:302021-11-25T01:13:21+5:30
वाळू तस्करांच्या मुसक्या आवळण्यासाठी महसूल व पोलीस प्रशासनाकडून वेळोवेळी कारवाई करण्यात आल्याचे आपणास पाहायला मिळते. तालुका महसूल प्रशासनाकडून एका ट्रॅक्टरकडून तब्बल १ लाख ३० हजार रुपयांची दंड आकारणीही केली गेली. मात्र बागलाण तालुक्यातील अगोदरच भ्रष्टाचाराच्या चौकशीचा सामना करत असलेल्या ताहाराबाद ग्रामपंचायतीच्या मालकीचा ट्रॅक्टरच मोसम नदीतून अवैध वाळू उपसा करताना शिवसेना तालुकाप्रमुख सुभाष नंदन व त्यांच्या सहकाऱ्यांनी रंगेहाथ पकडून दिल्याने बागलाण तालुक्यात खळबळ उडाली आहे.
सटाणा : वाळू तस्करांच्या मुसक्या आवळण्यासाठी महसूल व पोलीस प्रशासनाकडून वेळोवेळी कारवाई करण्यात आल्याचे आपणास पाहायला मिळते. तालुका महसूल प्रशासनाकडून एका ट्रॅक्टरकडून तब्बल १ लाख ३० हजार रुपयांची दंड आकारणीही केली गेली. मात्र बागलाण तालुक्यातील अगोदरच भ्रष्टाचाराच्या चौकशीचा सामना करत असलेल्या ताहाराबाद ग्रामपंचायतीच्या मालकीचा ट्रॅक्टरच मोसम नदीतून अवैध वाळू उपसा करताना शिवसेना तालुकाप्रमुख सुभाष नंदन व त्यांच्या सहकाऱ्यांनी रंगेहाथ पकडून दिल्याने बागलाण तालुक्यात खळबळ उडाली आहे.
जनतेचे सेवकच भक्षक बनल्याचे यानिमित्ताने स्पष्ट झाले असून अनधिकृत वाळू तस्करी करणारा ताहाराबाद ग्रामपंचायतीचा ट्रॅक्टर नागरिकांनीच महसूल प्रशासनाच्या ताब्यात दिल्याने तालुक्याचे तहसीलदार जितेंद्र इंगळे आता या ट्रॅक्टरवर काय कारवाई करतात याकडे बागलाणवासीयांचे लक्ष लागले आहे. ग्रामपंचायतीच्या मालकीचा असलेला ट्रॅक्टर कोणाच्या परवानगीने वाळूची वाहतूक करीत होता, असा सवाल शिवसेना तालुकाप्रमुख सुभाष नंदन यांनी उपस्थित केला असून ताहाराबाद ग्रामपंचायतीचे सत्ताधारी व ग्रामसेवक संगनमत करून ग्रामपंचायतीच्या मालकीच्या ट्रॅक्टरवरून वाळू उपसा करून गरजवंतांना विकून उखळ पांढरे करत असल्याचा आरोप केला आहे.ताहाराबाद तलाठी कार्यालयात हा ट्रॅक्टर जप्त करण्यात आला असून स्थानिक तलाठ्यांनी याबाबत तहसीलदार जितेंद्र इंगळे यांचे मार्गदर्शन मागविले आहे.
इन्फो
विरोधकांना मिळाले आयते कोलीत....
शिवसेना तालुकाप्रमुख सुभाष नंदन यांनी ताहाराबाद ग्रामपंचायत येथील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी नुकताच आत्मदहन करण्याचा इशारा दिलेला होता. जिल्हा प्रशासनाने नुकतीच नंदन यांच्या मागणीची दखल घेत चौकशी समितीची नेमणूक केलेली असताना व या चौकशी समितीकडून ग्रामपंचायत दप्तराची चौकशी सुरू असतानाच ग्रामपंचायतीच्या मालकीचाच ट्रॅक्टर अवैध वाळू वाहतूक करताना आढळून आल्याने विरोधकांना आयते कोलीत मिळाले आहे.