मोसम नदीपात्रातून बेकायदेशीर वाळू उपसा

By admin | Published: January 31, 2016 10:35 PM2016-01-31T22:35:06+5:302016-01-31T22:36:28+5:30

द्याने : भूजल पातळी घटण्याची भीती

Illegal sand extraction from the Seasam river valley | मोसम नदीपात्रातून बेकायदेशीर वाळू उपसा

मोसम नदीपात्रातून बेकायदेशीर वाळू उपसा

Next

द्याने : बागलाण तालुक्यातील मोसम नदीपात्रात अवैध वाळू उपसा मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने आगामी काळात जलसाठा व भूजल पातळी घटून शेती सिंचनासह तीव्र पाणीटंचाईला सामोरे जाण्याची वेळ मोसम खोऱ्यातील शेतकरी व जनतेवर येण्याची भीती व्यक्त होत आहे.
मोसम नदी बागलाण तालुक्यातील मोसम खोऱ्याची जीवनदायिनी म्हणून ओळखली जाते. या नदीच्या स्रोतामुळे नदीकाठी मोठ्या प्रमाणात गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरी आहेत. त्या विहिरींच्या काही फुटाच्या अंतरावर अवैध वाळू उपसण्याचा गंभीर प्रकार राजरोस होत असतानाही संबंधित यंत्रणेचे डोळे बंद का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. द्याने गावाने एकीचे दर्शन घडवत वाळू उपशावर बंदी घातली असून, विहिरीसाठी जागा न देणे असे निर्णय घेतले आहेत. मध्यरात्री वाळू उपसा केला जातो. प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या निवासस्थानापासून ते नदीपात्रापर्यंत मानवी साखळी उभी केली जाते. अनेकवेळा कार्यवाही होते. वाळूमाफिया बैलगाडीचा वापर वाळू उपसा करण्यासाठी करतात. नामपूर शहराची लोकसंख्या बघता भीषण पाणीटंचाई जाणवत आहे.
मोसम परिसरात आत्ताच दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. परिसरातील अनेक भागात विहिरींनी तळ गाठला असून, पिण्याच्या पाण्याच्या भीषण समस्येने अनेक ठिकाणी डोके वर काढले आहे. पाण्याच्या या गंभीर समस्येतून मार्ग काढण्यासाठी मोसम नदीचे आवर्तन हाच एकमेव मार्ग आहे. या आवर्तनाचा फायदा नदीकाठच्या गावांना व पाणीपुरवठा योजनांना होतो. परंतु वाळूमाफियांच्या खुलेआम वाळू उपशामुळे मोसम नदीची वाट लागली आहे. नदीत पडलेल्या दहा ते पंधरा फुटांच्या खड्ड्यांमुळे विहिरींची पाण्याची पातळी घटत चालली आहे. वाळू उपशामुळे पाणीपुरवठा योजना ठप्प झाल्या आहेत. उपशाचा हा काळा धंदा नदीपात्रात असाच सुरू राहिल्यास आगामी काळात गंभीर परिस्थितीला सामोरे जाण्याची वेळ येणार आहे. कारण यावर्षीही पावसाचे प्रमाण मागील वर्षीच्या तुलनेत फारच कमी आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात वाळूचा उपसा होत आहे. त्यास शेतकरी व ग्रामस्थांनी वारंवार विरोध करूनही पुन्हा वाळूचा उपसा अवैधरीत्या चढ्या दराने राजरोसपणे होत आहे. हा प्रकार प्रशासनापासून लपलेला नाही. हे सर्व माहीत असताना प्रशासकीय कर्मचारी या उपशाविरुद्ध कडक कारवाई करीत नसल्याने त्यांची मूकसंमती असल्याचे म्हटले जात आहे.
रात्री ट्रॅक्टरमध्ये वाळू भरण्यास विरोध केला असता कधीकधी वाळूमाफिया दादागिरी करतात; मात्र वाळू उपसा थांबविण्यासाठी महसूल विभाग व पोलीस प्रशासन डोळेझाक करत असल्याने अवैध वाळू उपसा करणाऱ्यांची चांदी झाली आहे. महसूल विभाग व वडनेर खाकुर्डी, नामपूर, जायखेडा पोलीस प्रशासनाने रात्री गस्त घालून अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी शेतकरीवर्ग व नागरिकांकडून केली जात आहे. (वार्ताहर)

Web Title: Illegal sand extraction from the Seasam river valley

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.