अवैध वाळू उपसा करणारा ट्रॅक्टर जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2019 01:12 AM2019-03-10T01:12:08+5:302019-03-10T01:13:10+5:30
निफाड तालुक्यातील नांदूरमधमेश्वर पक्षी अभयारण्याच्या परिसरात गोदावरी नदीपात्रात अवैधपणे वाळू उपसा करणारा ट्रॅक्टर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकून जप्त केला. यावेळी वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर व ट्रॉली सोडून फरार झाले
निफाड : तालुक्यातील नांदूरमधमेश्वर पक्षी अभयारण्याच्या परिसरात गोदावरी नदीपात्रात अवैधपणे वाळू उपसा करणारा ट्रॅक्टर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकून जप्त केला. यावेळी वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर व ट्रॉली सोडून फरार झाले
याबाबत नांदूरमधमेश्वर अभयारण्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी भगवान ढाकरे यांनी माहिती दिली. शनिवारी (दि.९) वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी हे अभयारण्य परिसरात गस्त घालत असताना गोदावरी पात्रात अवैधरीत्या वाळूचे उत्खनन सुरू असल्याचे पथकाच्या लक्षात येताच वाळू उत्खनन करणाऱ्यांनी निळ्या रंगाची वाळूची ट्रॉली व ट्रॅक्टर सोडून तेथून पोबारा केला. सदर दोन्ही वाहने, वाळू उत्खननाची साधने, साहित्य वनविभागाने जप्त केले आहेत. विशेष म्हणजे या दोन्ही वाहनांवर नंबरप्लेट नव्हती. त्यामुळे अवैध वाळू वाहतूक करणारे वाहनांना पकडले जाऊन कारवाई होण्याच्या भीतीने नंबरप्लेट लावत नसल्याचे समोर आले आहे. या कारवाईत वनरक्षक अश्विनी पाटील, संरक्षण मजूर आघाव, जाधव, गांगुर्डे सहभागी झाले होते.