मातोरीत अवैध सॉ मिल उद्ध्वस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2019 12:04 AM2019-11-17T00:04:37+5:302019-11-17T00:05:52+5:30
मागील काही दिवसांपासून अवैधरीत्या मौजे मातोरी शिवारात बेकायदेशीरपणे सॉ मिल सुरू करून तेथे आरायंत्र उभारून वृक्षांच्या लाकूड कापले जात होते.
नाशिक : मागील काही दिवसांपासून अवैधरीत्या मौजे मातोरी शिवारात बेकायदेशीरपणे सॉ मिल सुरू करून तेथे आरायंत्र उभारून वृक्षांच्या लाकूड कापले जात होते. याबाबत मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे शनिवारी (दि.१६) सकाळच्या सुमारास नाशिक पश्चिम वनविभागाच्या प्रादेशिक पथकाने छापा टाकून आरागिरणी उद्ध्वस्त केली.
याबाबत वनविभागाच्या सूत्रांनी दिलेली माहिती अशी, मातोरी शिवारात संशयित आरोपी पांडुरंग मुरलीधर चारोस्कर याने त्याच्या राहत्या घराच्या पाठीमागे रस्त्याच्या कडेला असलेल्या मोकळ्या जागेत विनापरवाना लाकूड कापण्याची आरागिरणी सुरू केली होती. या आरागिरणीमध्ये मोठमोठ्या वृक्षांच्या फांद्या, बुंध्यांची कापणी केली जात होती. यासाठी संशयित चारोस्कर याने १६ इंची करवत (ब्लेड) असलेले उभे आरायंत्रदेखील उभारले होते. या उभ्या आरायंत्रामार्फत सर्रासपणे लाकडांची कापणी येथे मागील काही महिन्यांपासून केली जात होती. याबाबत वनक्षेत्रपाल विवेक भदाणे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे त्यांनी सहायक वनसंरक्षक गणेश झोळे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल मधुकर गोसावी, अनिल अहिरराव, शांताराम भदाणे, ओंकार देशपांडे, वनरक्षक राजेंद्र ठाकरे, सचिन अहिरराव, उत्तम पाटील, रोहिणी पाटील, वर्षा पाटील यांच्या पथकाने आरागिरणीवर सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास धाड टाकली. यावेळी संशयित चारोेस्कर हा राहत्या घरी आढळून आला नाही. आजूबाजूला वनकर्मचाऱ्यांनी चौकशी केली असता तो बाहेरगावी गेला असल्याचे समजले. पथकाने आरायंत्र, १ इलेक्ट्रिक मोटारसह संपूर्ण सांगाडा असा एकूण ५० ते ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वर्षभरापूर्वीही चारोस्करविरुद्ध गुन्हा
१३ डिसेंबर २०१८ साली चारोस्करविरुद्ध याच पद्धतीने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चारोस्करने तेव्हाही बेकायदेशीररीत्या आरायंत्र उभारून तोडलेल्या लाकडांची कापणी करण्याची गिरणी चालविली होती. वनविभागाने छापा टाकून त्याचे संपूर्ण साहित्य जप्त केले होते. यानंतर पुन्हा चारोस्करकडून गिरणी सुरू करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत होते. आठ ते दहा महिन्यांपूर्वी वनविभागाकडून कारवाई करण्यात येऊनदेखील पुन्हा चारोस्करने नेमक्या कोणाच्या वरदहस्ताने अवैधरीत्या व्यवसाय सुरू केला? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
लाकडांचा
पुरवठादार कोण?
चारोस्करच्या आरागिरणीत बेकायदेशीरपणे लाकडांचा पुरवठा करणारा पुरवठादार शोधण्याचे आव्हान आता वनविभागापुढे आहे. जिल्ह्यातील नेमक्या कुठल्या भागात अवैध वृक्षतोड केली जात होती, याचा तपास वनविभाग करत आहेत.