साडेपाच लाखांचा अवैध मद्यसाठा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2022 01:25 AM2022-02-12T01:25:51+5:302022-02-12T01:26:11+5:30
महाराष्ट्र राज्यात विक्रीसाठी प्रतिबंधित असलेल्या तसेच केवळ दादरा नगर हवेली याठिकाणी विक्रीसाठी मान्यता असलेल्या मद्याचा तब्बल तीन लाख रुपयांहून अधिक किमतीचा साठा राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाने शुक्रवारी पांढुर्लीच्या शिवारात पकडला आहे. या मुद्देमालासह भरारी पथकाने अनिल सीताराम साळुंखे (३२, रा. सिंकाराबाद सोसायटी, सिल्वाना बेकरीजवळ, संसरी लेन नं. २, देवळाली कॅम्प) याला अटक केली असून, मद्यसाठा व त्याच्या अवैध वाहतुकीसाठी वापरण्यात आलेले चारचाकी वाहन असा एकूण ३ लाख २४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
नाशिक : महाराष्ट्र राज्यात विक्रीसाठी प्रतिबंधित असलेल्या तसेच केवळ दादरा नगर हवेली याठिकाणी विक्रीसाठी मान्यता असलेल्या मद्याचा तब्बल तीन लाख रुपयांहून अधिक किमतीचा साठा राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाने शुक्रवारी पांढुर्लीच्या शिवारात पकडला आहे. या मुद्देमालासह भरारी पथकाने अनिल सीताराम साळुंखे (३२, रा. सिंकाराबाद सोसायटी, सिल्वाना बेकरीजवळ, संसरी लेन नं. २, देवळाली कॅम्प) याला अटक केली असून, मद्यसाठा व त्याच्या अवैध वाहतुकीसाठी वापरण्यात आलेले चारचाकी वाहन असा एकूण ३ लाख २४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्रमांक एकचे दुय्यम निरीक्षक यशपाल पाटील यांना शुक्रवारी (दि. ११) पांढुर्ली शिवारात घोटी - सिन्नर रोड भागात चारचाकी वाहनातून अवैध मद्याची तस्करी होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्याआधारे भरारी पथकाने कारवाई करत पांढुर्ली शिवारात समरा वाईसजवळ तपासणी करत चारचाकी (एमएच ०४, सीजे ६८३६)मध्ये केवळ दादरा नगर हवेली याठिकाणी विक्रीसाठी मान्यता असलेल्या व महाराष्ट्रात विक्रीसाठी प्रतिबंधित असलेल्या विदेशी मद्याच्या वेगवेगळ्या ब्रॅंडच्या सीलबंद बाटल्यांसह महाराष्ट्रात लावण्याकरिता लागणारे वेगवेगळया ब्रॅंडचे बनावट ४ हजार प्लास्टिकचे स्टिकर सापडले. या कारवाईत भरारी पथकाचे निरीक्षक जयराम जाखेरे, दुय्यम निरीक्षक अरुण सुत्रावे, सुनील दिघोळे, धनराज पवार, महेंद्र भोये, राहुल पवार, अनिता भांड यानी महत्त्वाची भूमिका पार पाडली. या प्रकरणाचा अधिक तपास दुय्यम निरीक्षक यशपाल पाटील करत आहेत.
इन्फो-
विजयनगर भागातूनही अवैध मद्य जप्त
पांढुर्लीत राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाने केलेल्या कारवाईसोबतच दुय्यम निरीक्षक शिवाजी चव्हाणके यांनी भगूर परिसरात विजयनगर पेट्रोल पंपाजवळ रेल्वेपुलाच्या बाजूला वाहन तपासणी करत असताना कार (एमएच १५, सीएम ९६४६)मधून केवळ दादरा नगर हवेली याठिकाणी विक्रीसाठी मान्यता असलेल्या वेगवेगळ्या ब्रँडचा सुमारे २ लाख १३ हजार दोनशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत गंगाराम साबळे, दुय्यम निरीक्षक गणपत अहिरराव, मनोहर गुरुड यांच्यासह विरेंद्र वाघ, राजेंद्र चव्हाणके, सुनीता महाजन, वंदना देवरे यांच्या पथकाने महत्त्वाची भूमिका पार पाडली. दुय्यम निरीक्षक शिवाजी चव्हाणके या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.