कुंभमेळ्याच्या नावाखाली अवैध वाहतुकीची ‘पर्वणी
By admin | Published: September 11, 2015 11:03 PM2015-09-11T23:03:54+5:302015-09-11T23:04:29+5:30
’यंत्रणेचे दुर्लक्ष : अव्वाच्या सव्वा भाडे वसुली
नाशिक : कुंभमेळ्याच्या नावाखाली शहरात विविध ठिकाणी आलेल्या भाविकांना रामकुंड आणि त्र्यंबकेश्वर येथे नेण्या आणण्याच्या निमित्ताने अवैध वाहतूक सुरू असून, अवास्तव भाडे आकारले जात आहेत. इतकेच नव्हे तर अनेक भाविकांकडून आगाऊ पैसे घेऊन मोटार न पाठविता फसवणूक केली जात आहे. आॅल इंडिया टुरिस्ट अँड ट्रान्सपोर्ट असोसिएशनने या प्रकारास आक्षेप घेतला असून, या वाहतुकीला प्रतिबंध करण्याची मागणी केली आहे.
कुंभमेळ्याच्या निमित्ताने शहरातील विविध धर्मशाळा आणि लॉन्समध्ये देशाच्या विविध भागांतून नागरिक तात्पुरत्या स्वरूपात वास्तव्याला आले आहेत. काही भाविक आखाड्यांमध्ये साधू-महंतांबरोबरच राहत असून, त्यांना रामकुंड आणि अन्य ठिकाणचे देवदर्शन घडविणे त्र्यंबकेश्वर येथे कुशावर्तावर स्नानासाठी नेण्यासाठी अवैध प्रवासी वाहतूक सुरू आहे. ज्या खासगी मोटारींनी टॅक्सी परवाना घेतला नाही आणि शासनानचे प्रवासी वाहन म्हणून कर भरलेले नाहीत अशा या मोटारचालकांकडून प्रवासी सेवा देताना अव्वाच्या सव्वा वसूल केले जात आहे. इतकेच नव्हे तर काही मोटारचालक तर आगाऊ पैसे घेतात आणि मोटारच न पाठविता फसवणूक करीत आहेत. विशेष म्हणजे वाहतूक निर्बंध असताना पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने या गाड्या सर्रास फिरत असून, त्यांना कोणीही प्रतिबंध केलेला नाही, अशी तक्रार संघटनेने केली आहे. त्यातच आरटीओ कर्मचारी मात्र अशा गाड्यांचे क्रमांक मागतात. सध्या अशा दोन हजार मोटारी असून, त्यांची नावे संघटना कशी काय देणार, असा प्रश्न संघटनेचे अध्यक्ष दिलीपसिंग बेनीवाल यांनी केला आहे.