‘विहिंप’ची पाटी वाहनावर बेकायदेशीर
By admin | Published: July 8, 2017 01:23 AM2017-07-08T01:23:20+5:302017-07-08T01:23:35+5:30
नाशिक : गोरक्षक मच्छिंद्र शिर्के यांच्या वाहनावर लावलेली ‘जिल्हा मंत्री, विश्व हिंदू परिषद’ अशी पाटी बेकायदेशीर आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : मालेगाव येथील विश्व हिंदू परिषदेचे जिल्हामंत्री तथा गोरक्षक मच्छिंद्र शिर्के यांच्या वाहनावर लावलेली ‘जिल्हा मंत्री, विश्व हिंदू परिषद’ अशी पाटी बेकायदेशीर असून, त्यांनी प्राणी संरक्षण कायद्यान्वये केलेली कृतीदेखील कायदेशीर नसल्याचे स्पष्टीकरण सरकारच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात देण्यात आले असून, शिर्के यांच्याविरुद्ध बेकायदेशीर पाटी लावल्याबद्दल छावणी पोलीस ठाण्यात मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याचेही सांगण्यात आले आहे.
मालेगावातील संगमेश्वर भागात मच्छिंद्र शिर्के यांच्यावर हल्ला केल्याच्या कारणावरून छावणी पोलीस ठाण्यात तन्वीरखान खलीलखान यांच्यासह २५ ते ३० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्पूर्वी १४ फेब्रुवारी २०१७ रोजी मालेगाव येथे काही व्यक्ती गायींची वाहतूक करीत असल्याच्या संशयावरून गोवंश संरक्षण समितीच्या कार्यकर्त्यांनी वाहनचालक व क्लीनर यांना मारहाण केली होती. या प्रकरणी मालेगाव तालुका पोलीस ठाण्यात गोवंश संरक्षण समितीचे
सुभाष मालू, मच्छिंद्र शिर्के आदींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याची प्रतिक्रिया म्हणून शिर्के यांच्यावर हल्ला करण्यात आल्याच्या या घटनेने मालेगावातील वातावरण तप्त झाले होते. शिर्के यांना मारहाण करणारा प्रमुख संशयित तन्वीरखान याचा मालेगाव सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. त्यावर त्याने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली असता न्यायालयाने १२ जूनपर्यंत अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला होता; मात्र हा जामीन मंजूर करताना न्यायालयाने शिर्के यांच्या वाहनावर लावलेली ‘जिल्हा मंत्री, विश्व हिंदू परिषद’ ही पाटी कायदेशीर आहे किंवा कसे याबाबत सरकारने शहानिशा करावी तसेच पाटी लावणे बेकायदेशीर असेल तर पोलिसांनी त्यावर काय कार्यवाही केली याचा खुलासा करावा, अशी सूचना सरकारला केली होती.