ओतूर धरणातून पाण्याचा अवैध उपसा
By Admin | Published: December 11, 2015 11:15 PM2015-12-11T23:15:49+5:302015-12-11T23:23:33+5:30
ओतूर धरणातून पाण्याचा अवैध उपसा
ओतूर : ओतूर धरणातून सध्या परिसरातील काही शेतकरी कृषिपंप व आॅइल इंजिनद्वारे अवैधपणे पाण्याचा उपसा करीत आहेत, तो त्वरित बंद करावा, अशी मागणी सरपंच दादाजी सूर्यवंशी व ग्रामस्थांनी केली आहे. ओतूर ग्रामपंचायतीच्या १५ आॅगस्टला झालेल्या ग्रामसभेत त्याबाबत ठराव केला होता, तरीही परिसरातील काही शेतकरी राजरोसपणे पाण्याचा उपसा शेतीसाठी करताना दिसत आहेत. आजमितीस धरणात ४० टक्के पाण्याचा साठा आहे. या धरणाच्या पाण्यावर परिसरातील गावांचा पाणीपुरवठा अवलंबून आहे. पाणी उपसा चालू राहिला तर येत्या मार्च महिन्यात ओतूर गावाला पिण्याच्या पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. भविष्यात पिण्याच्या पाण्याबरोबरच जनावरांच्या पाण्याचीही मोठी टंचाई भासणार आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही ओतूर धरणातील निम्मे पाणी गळून गेले आहे. जो काही थोडाफार पाण्याचा साठा उपलब्ध आहे त्यावर परिसरातील शेतकरी अवलंबून आहेत. धरणात पाणी असल्यामुळे धरणाच्या दुरुस्तीचे काम सध्या बंद आहे. पाणी संपल्यानंतर मार्च महिन्यात सदर काम सुरू करण्यात येणार आहे. सदर अवैध पाण्याचा उपसा थांबवावा याबाबत संबंधित अधिकारी, तहसीलदार कळवण, लघु पाटबंधारे विभाग कळवण यांना ग्रामपंचायतीमार्फत निवेदन पाठविण्यात आले आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी ओतूर धरणातून होणारा पाण्याचा अवैध उपसा त्वरित बंद करावा, अशी मागणी माजी सरपंच प्रा. अशोक देशमुख, ग्रामपंचायत सदस्य दादा मोरे यांच्यासह असंख्य ग्रामस्थांनी केली आहे. (वार्ताहर)