‘आयएमए’कडून सरकारचा धिक्कार’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2018 12:16 AM2018-07-29T00:16:56+5:302018-07-29T00:17:13+5:30

राष्टय वैद्यकीय आयोग विधेयक लोकसभेत मांडले जाणार असून, हे विधेयक देशातील वैद्यकीय क्षेत्र व त्यासंबंधित सर्व घटकांचे नुकसान करणारे असल्याचा आरोप इंडियन मेडिकल असोसिएशन या डॉक्टरांच्या संघटनेने केला आहे. या विधेयकाला तीव्र विरोध दर्शविण्यासाठी संघटनेकडून शनिवारी (दि.२८) एकदिवसीय राष्टÑव्यापी संप पुकारण्यात आला होता.

'IMA' condemns government ' | ‘आयएमए’कडून सरकारचा धिक्कार’

‘आयएमए’कडून सरकारचा धिक्कार’

Next

नाशिक : राष्टय वैद्यकीय आयोग विधेयक लोकसभेत मांडले जाणार असून, हे विधेयक देशातील वैद्यकीय क्षेत्र व त्यासंबंधित सर्व घटकांचे नुकसान करणारे असल्याचा आरोप इंडियन मेडिकल असोसिएशन या डॉक्टरांच्या संघटनेने केला आहे. या विधेयकाला तीव्र विरोध दर्शविण्यासाठी संघटनेकडून शनिवारी (दि.२८) एकदिवसीय राष्टÑव्यापी संप पुकारण्यात आला होता.  या संपात नाशिक शहरातील अडीच हजार व जिल्ह्यातील एक हजार असे एकूण साडेतीन हजार डॉक्टर सहभागी झाल्याचा दावा संघटनेने केला. शहरातील विविध दवाखाने, रुग्णालयांमध्ये बाह्यरुग्ण तपासणी व कुठल्याही शस्त्रक्रिया शनिवारी न करून सरकारचा धिक्कार केला.
राष्टÑीय वैद्यकीय आयोग विधेयकाविरुद्ध देशभरातील डॉक्टरांनी आयएमएच्या माध्यमातून शनिवारी रुग्ण सेवा बंद ठेवत सरकारविरुद्ध तीव्र संताप व्यक्त करत ‘धिक्कार दिन’ पाळला. शहरासह जिल्ह्यातील बाह्यरुग्ण तपासणी दिवसभर खासगी डॉक्टरांकडून बंद ठेवण्यात आली होती. शहरातील विविध डॉक्टरांच्या दवाखान्यांमध्ये ‘आज डॉक्टर संपावर’ असे सूचना फलक लावण्यात आले होते.
दरम्यान, दुपारी शालिमार येथील आयएमएच्या कार्यालयात सर्व सभासद व संचालकांनी एकत्र येत बैठक घेतली. या बैठकित विधेयकाला कडाडून विरोध करण्यात आला. तसेच हे विधेयक सरकारने रेटून नेण्याचा प्रयत्न केल्यास आयएमएकडून देशपातळीवर आंदोलन तीव्र करण्यात येणार असल्याचा इशाराही देण्यात आला. तसेच जिल्हाधिकारी व खासदार हेमंत गोडसे यांनाही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून निवेदन देण्यात आले. वैद्यकीय आयोग विधेयकाचे धोके त्यांच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न करण्यात आला. याप्रसंगी अध्यक्ष डॉ. आवेश पलोड, सचिव डॉ. नितीन चिताळकर, मानसोपचारतज्ज्ञ डॉ. हेमंत सोननीस, डॉ. विशाल गुंजाळ आदी पदाधिकारी उपस्थित होते.
एक हजार दवाखान्यांत ‘नो-ओपीडी’
राष्टय वैद्यकीय विधेयक श्रीमंती पोसणारे असून, गरिबीवर यामुळे संकट येणार असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. शहरात अ‍ॅलोपॅथीद्वारे उपचार करणारे सुमारे पाचशे रुग्णालये आहेत. तसेच दवाखान्यांची संख्या एक हजारांवर आहे. शहरातील या सर्व रुग्णालयांसह दवाखान्यांमध्ये दिवसभर कुठल्याहीप्रकारे बाह्यरुग्णांची तपासणी व औषधोपचार करण्यात आला नाही. आणीबाणीच्या परिस्थितीत प्रचंड गंभीर अवस्थेतील रुग्णांवर डॉक्टरांकडून औषधोपचार व तातडीच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्याचे संघटनेने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

Web Title: 'IMA' condemns government '

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.