इमामशाही : ‘मुहर्रम’चा पारंपरिक यात्रोत्सवहिंदू-मुस्लीम ऐक्याचे दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2017 12:12 AM2017-10-02T00:12:41+5:302017-10-02T00:12:57+5:30
शेकडो वर्षांची परंपरा लाभलेल्या जुने नाशिकमधील सारडा सर्कल येथील इमामशाही दर्ग्याच्या परिसरात मुहर्रमच्या पारंपरिक यात्रोत्सवात हिंदू-मुस्लीम ऐक्याचे दर्शन घडले.
नाशिक : शेकडो वर्षांची परंपरा लाभलेल्या जुने नाशिकमधील सारडा सर्कल येथील इमामशाही दर्ग्याच्या परिसरात मुहर्रमच्या पारंपरिक यात्रोत्सवात हिंदू-मुस्लीम ऐक्याचे दर्शन घडले.
रविवारी (दि.१) मुहर्रम महिन्याचा आशुराचा दिवस पाळण्यात आला. परंपरेनुसार यादिवशी इमामशाही येथे हिरवळीचा ताबूत मैदानात भाविकांच्या दर्शनासाठी खुला करण्यात आला. संध्याकाळी मानाचा ताबूत यात्रेमध्ये आणण्यात आला होता. पाच वाजेपासून तर रात्री दहा वाजेपर्यंत आदिवासी, हिंदू बांधवांनी ताबुताच्या ‘खांदेकरी’ची भूमिका पार पाडली. इमामशाही यात्रोत्सवाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे हा ताबूत पारंपरिक प्रथेनुसार दहा दिवस परिश्रम घेऊन मुस्लीम सय्यद कुटुंबीयांनी तयार केला आणि परंपरेनुसार ताबुताच्या खांदेकरीचा भूमिका महादेव कोळी समाजबांधवांनी पार पाडत हिंदू-मुस्लीम ऐक्याचे दर्शन घडविले. दरम्यान, दर्ग्यावर आकर्षक रोषणाई करण्यात आली होती. तसेच परिसरात यात्रा भरविण्यात आल्याने भाविकांची मोठी गर्दी लोटली होती. विविध खेळण्यांच्या दुकानांसह खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी दुकाने थाटल्याने परिसरातील नागरिकांनी यात्रेचा आनंद लुटला. ताबुतासोबत तरुणाईने आधुनिक स्मार्टफोनचा वापर करत ‘सेल्फी’ क्लिक करून ती छायाचित्रे सोशल मीडियावरही पोस्ट केली.