आयएमएच्या डॉक्टरांनी पाळला काळा दिवस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:12 AM2021-06-02T04:12:26+5:302021-06-02T04:12:26+5:30
नाशिक : योगगुरू रामदेवबाबा यांनी ॲलोपॅथीबाबत केलेल्या कथित वादग्रस्त वक्तव्यावरून इंडियन मेडिकल असोसिएशनसह विविध वैद्यकीय संघटनांनी आक्रमक भूमिका घेत ...
नाशिक : योगगुरू रामदेवबाबा यांनी ॲलोपॅथीबाबत केलेल्या कथित वादग्रस्त वक्तव्यावरून इंडियन मेडिकल असोसिएशनसह विविध वैद्यकीय संघटनांनी आक्रमक भूमिका घेत मंगळवारी (दि.१) काळा दिवस पाळत रामदेवबाबा यांच्याविरोधात निषेध नोंदविला. मात्र, डॉक्टरांनी त्यांच्या या आंदोलनाच्या कोणताही फटका रुग्णसेवेला बसू दिला नाही. डॉक्टरांनी नियमित कामकाज करताना आपल्या कोट, ॲप्रन, पीपीई किटवर काळ्या फिती लावून काम करीत रामदेवबाबा यांच्या विरोधात निषेध नोंदविला.
नाशिक शहरातील डॉक्टरांनी मंगळवारी (दि.१) काळा दिवस पाळत काळ्या फिती लावून रामदेवबाबांच्या विरोधात निषेध नोंदविण्याची भूमिका घेतली असली तरी त्याचा रुग्णसेवेवर कोणताही परिमाण झाला नाही. डॉक्टरांनी त्यांचे नियमित कामकाज करतानाच दैनंदिन रुग्णसेवा केल्याची माहिती आयएमए नाशिकच्या सचिव डॉ. कविता गाडेकर यांनी दिली. डॉक्टरांनी रामदेवबाबा यांच्याविरोधात निषेधाची भूमिका घेतली असली तरी या आंदोलनाचा रुग्णांना कोणताही त्रास झाला नाही. सर्व रुग्णालयांमध्ये व बाह्यरुग्ण कक्षांमध्ये नियमित कामकाज सुरू असल्याचे दिसून आले. दरम्यान, काही डॉक्टरांनी सोशल मीडियावर काळा डीपी ठेवत रामदेवबाबा यांच्याविरोधात निषेध नोंदविला.