पंतप्रधानांच्या वक्तव्याचा ‘आयएमए’कडून निषेध काळ्या फिती लावून काम : औषधांच्या किमती सरकारनेच नियंत्रणात आणण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2018 12:33 AM2018-04-27T00:33:47+5:302018-04-27T00:33:47+5:30
नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लंडन येथे भारतीय डॉक्टरांबद्दल अनुद््गार काढल्याने त्याचा आयएमए नाशिक शाखेच्या वतीने निषेध करण्यात आला आहे.
नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लंडन येथे भारतीय डॉक्टरांबद्दल अनुद््गार काढल्याने त्याचा आयएमए नाशिक शाखेच्या वतीने निषेध करण्यात आला आहे. गुरुवारी (दि.२६) शहरातील डॉक्टरांनी काळ्या फिती लावून काम केले. आयएमए हॉल येथे दुपारी झालेल्या पत्रकार परिषेदत याविषयी अधिक माहिती देताना अध्यक्ष डॉ. आवेश पलोड यांनी सांगितले की, पंतप्रधानांसारख्या जबाबदार व्यक्तीने दुसऱ्या देशात जाऊन आपल्या देशातील डॉक्टरांबद्दल असे बोलणे अनुचित वाटते. आजच्या घडीला इंग्लंडमध्ये ६० टक्के भारतीय डॉक्टर आहेत. यानिमित्ताने त्यांच्यासमोरही भारतीय डॉक्टरांची चुकीची प्रतिमा गेली. आयएमएने जेनेरिक औषधांचा नेहेमीच आग्रह धरला आहे. आयएमएच्या मुख्यालयात सदर औषधांचे दुकान फार पूर्वीच सुरू केले होते. ‘एक कंपनी, एक औषध, एक किंमत’ यासाठी आयएमएने सातत्याने पाठपुरावा केला आहे. स्टेंटच्या किमती नियंत्रणात ठेवणे आणि रुग्णास निर्णयाचे स्वातंत्र असावे यासाठी आयएमए प्रयत्नशील आहे. भारतातील वैद्यकीय सेवा ही बाहेरील देशांच्या वैद्यकीय सेवेच्या तुलनेत स्वस्त असल्याचेही यावेळी अधोरेखित करण्यात आले. भारतात ७० टक्के रुग्णसेवा ही लहान दवाखाने, नर्सिंग होम, हॉस्पिटल यांच्याद्वारे, तर केवळ ३० टक्के रुग्णसेवा ही कॉर्पोरेट हॉस्पिटलद्वारे दिली जाते. त्यातही अनेक कॉर्पोरेट दवाखान्यांच्या स्टेंट, औषधांच्या स्वत:च्या कंपन्याही आहेत. त्यामुळे हे दर निश्चित करण्याचे काम सरकार आणि कंपन्यांनी पार पाडणे अपेक्षित असताना त्याचे खापर डॉक्टरांवर फोडले जात आहे. याप्रसंगी डॉ. नितीन चिताळकर, डॉ. पंकज भदाणे, डॉ. विशाल पवार आदी उपस्थित होते.