आयएमएतही कोविड उपचार केंद्राचा प्रस्ताव!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:15 AM2021-04-09T04:15:11+5:302021-04-09T04:15:11+5:30
जनजागृतीसाठी व्हिडिओ मालिका नाशिक : कोरोना काळात सर्व डाॅक्टर आणि त्यांचे सहकारी, कर्मचारी कोरोनायोद्धे म्हणून काम करीत आहेत. आयएमएने ...
जनजागृतीसाठी व्हिडिओ मालिका
नाशिक : कोरोना काळात सर्व डाॅक्टर आणि त्यांचे सहकारी, कर्मचारी कोरोनायोद्धे म्हणून काम करीत आहेत. आयएमएने या काळात खूप मोलाची भूमिका बजावली आहे. आता शालिमार येथील आयएमएच्या रुग्णालयात कोविड उपचार सुरू करण्याचा विचार असल्याचे इंडियन मेडिकल असोसिएशनच्या नाशिक शाखेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. हेमंत सोननीस यांनी सांगितले. डॉ. सोननीस यांनी नुकतीच सूत्रे घेतली. कोरोनाचा दुसरा टप्पा असताना अत्यंत आव्हानात्मक काळात त्यांनी सूत्रे स्वीकारली आहेत. त्यानंतर ‘लोकमत’शी बोलताना त्यांनी आपल्या कारकिर्दीतील योजनांची माहिती दिली.
प्रश्न- एका आव्हानात्मक स्थितीत अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारत आहात, याबद्दल काय वाटते, या काळात कोणती नवी योजना आखली आहे?
डॉ. सोननीस- कोरोना काळात म्हणजेच आव्हानात्मक काळात काम करण्याची संधी मिळाली आहे. सध्या नाशिक शहरात सर्व डॉक्टर अत्यंत कठीण काळात समाजासाठी काम करीत आहेत. त्यांनाही अनेक अडचणी आहेत. ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे त्यांच्या समस्या सोडविण्यावर भर देण्यात येणार आहे. आयएमए कार्यालयाच्या आवारात सध्या कोरोना चाचणी आणि लसीकरण दाेन्ही महापालिकेच्या सहकार्याने सुरू आहे. या ठिकाणी बाल रुग्णालय असून, सध्या कोविडमुळे ते बंद आहे. त्या ठिकाणी कोविड उपचार केंद्र सुरू करता येईल काय याबाबत फिजीशियन्सशी चर्चा करून निर्णय घेण्यात येणार आहे.
प्रश्न- सध्या कोरोनाचे वाढते प्रमाण आहे. त्याबाबत आयएमए समाजासाठी काय करू इच्छीते?
डॉ. सोननीस- कोरोनाबाबत जनजागृतीची गरज आहे. सध्या जाहीर कार्यक्रमांतून ते शक्य नसले तरी व्हिडिओ मालिका तयार करून ती लोकापर्यंत पोहोचविण्याचे नियोजन आहे.
प्रश्न- डॉक्टरांसाठी आणखी काय करण्याची योजना आहे?
डॉ. साेननीस- काही चांगल्या येाजना आहेत; परंतु कोविडनंतर त्या प्रभावीपणे राबवता येतील. डॉक्टरच नव्हेतर, समाजातील विविध घटकांसाठी संतुलित जीवनशैली कशी असावी यावर भर देण्यात येणार आहे. धावपळ खूप होते. त्याचा मनावर आणि आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होतो. त्यामुळे केवळ कामाचा ताण न घेता कुटुंब, छंदासाठीदेखील वेळ दिला पाहिजे अशा प्रकारची संतुलित जीवनशैली आरोग्यदायी ठरेल.