सातपूर, अंबड औद्योगिक वसाहतीला भेडसावणाऱ्या समस्यांवर तातडीने उपाययोजना

By admin | Published: December 14, 2014 02:07 AM2014-12-14T02:07:50+5:302014-12-14T02:08:15+5:30

सातपूर, अंबड औद्योगिक वसाहतीला भेडसावणाऱ्या समस्यांवर तातडीने उपाययोजना

Immediate measures for the problems faced by Satpur, Ambad industrial colony | सातपूर, अंबड औद्योगिक वसाहतीला भेडसावणाऱ्या समस्यांवर तातडीने उपाययोजना

सातपूर, अंबड औद्योगिक वसाहतीला भेडसावणाऱ्या समस्यांवर तातडीने उपाययोजना

Next

नाशिक : सातपूर, अंबड औद्योगिक वसाहतीला भेडसावणाऱ्या समस्यांवर तातडीने उपाययोजना केल्या जाणार असून, वसाहतीला झळाळी देण्याच्यादृष्टीने स्वत:हून प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन राज ठाकरे यांनी उद्योजकांना दिले आहे. यावेळी आयुक्त प्रवीण गेडाम यांनीही उद्योजकांच्या मागण्यांवर सकारात्मक चर्चा करीत त्यांना मनपाकडून सर्वोत्तपरी मदत देण्याच्यादृष्टीने प्रयत्न केले जाणार असल्याचे सांगितले. दोन दिवसीय नाशिक दौऱ्यावर असलेल्या राज ठाकरे यांची शासकीय विश्रामगृह येथे उद्योजकांच्या शिष्टमंडळासोबत बैठक झाली. बैठकीत उद्योजकांकडून रस्ते, पथदीप, ड्रेनेज, घंटागाडी, फायर स्टेशन, औद्योगिक क्षेत्रासाठी वाढीव क्षेत्र, कायमस्वरूपी प्रदर्शन केंद्राची तरतूद आदि मागण्यांचा पाढा वाचून दाखविला. आयमा अध्यक्ष विवेक पाटील यांनी, औद्योगिक वसाहतीतील रस्त्यांची अवस्था अतिशय दयनीय असून, कुठल्याही सोयी-सुविधा उपलब्ध नसल्याचे सांगितले. वसाहतीत घंटागाडी फिरकतच नसल्याने जागोजागी कचऱ्याचे ढिगारे बघावयास मिळतात. याबाबत मनपाकडे तक्रारी करून देखील कुठल्याही उपाययोजना केल्या जात नसल्याने उद्योजकांनीच दर रविवारी स्वच्छता अभियान हा उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे. त्याचबरोबर पथदीप, ड्रेनेजसारख्या प्राथमिक समस्यादेखील उद्योजकांना भेडसावत असल्याचे सांगितले. यावर आयुक्त गेडाम यांनी घंटागाड्यांचे लवकरच नियोजन केले जाणार असल्याचे सांगितले. उद्योजकांसाठी कायमस्वरूपी प्रदर्शन केंद्र व औद्योगिक क्षेत्र देण्याबाबतदेखील सकारात्मक चर्चा करण्यात आली. तसेच गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित असलेला फायर स्टेशनचा मुद्दादेखील लवकरच मार्गी लावला जाणार असून, महापालिका याबाबतची संपूर्ण जबाबदारी स्वीकारणार असल्याचे आयुक्त गेडाम यांनी स्पष्ट केले.
यावेळी महापौर अशोक मुर्तडक, स्थायी समिती सभापती राहुल ढिकले, सभागृह नेता शशिकांत जाधव, आयमाचे माजी अध्यक्ष सुरेश माळी, संतोष मंडलेचा, संजीव नारंग, निमा अध्यक्ष रवींद्र वर्मा, मंगेश पाटणकर, मनीष कोठारी, अनिल बावीस्कर, ज्ञानेश्वर गोपाळे, उन्मेश कुलकर्णी, आशिष नहार, मिलिंद राजपूत, सुधाकर देशमुख, डॉ. प्रदीप पवार आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Immediate measures for the problems faced by Satpur, Ambad industrial colony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.