बागलाणमधील बाधित पिकांचे तातडीने पंचनामे करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 04:51 PM2020-12-15T16:51:28+5:302020-12-15T16:52:07+5:30
सटाणा : बागलाण तालुक्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या द्राक्ष,कांदा ,शेवगा पिकांसह रब्बी पिकांचे तत्काळ पंचनामे करून त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश कृषी मंत्री दादा भुसे यांनी यंत्रणेला दिले.
बागलाण तालुक्यात दि. ११ ते १४ डिसेंबर दरम्यान ढगाळ हवामान आणि अवकाळी पाऊस झाल्यामुळे लाखो रुपये खर्च करुन सुमारे ८०० हेक्टर क्षेत्रावरील द्राक्ष पिक पूर्णपणे बाधित होऊन वाया गेले आहे. यामुळे अर्ली द्राक्ष पीक घेणाऱ्या उत्पादकांचा यंदाचा हंगामच वाया जाऊन कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. गेल्या वर्षी देखील अशाच प्रकारे हातातोंडाशी आलेला घास निसर्गाच्या लहरीपणामुळे हिराहून नेला. तीच परिस्थिती कांदा उत्पादक शेतकऱ्यांची आहे. महागडे बियाणे खरेदी करून कांद्याचे रोपे तयार केली. एकरी हजारो रुपये खर्च लागवड केली. मात्र या अवकाळी पावसाने काबाडकष्ट करणाऱ्या बळीराजाचे स्वप्न धुळीस मिळाले.या अवकाळीने सुमारे साडे पाच हजार हेक्टर क्षेत्रावरील कांदा पीक करपा रोगाने बाधित झाले आहे. तसेच बहुतांश शेवगा पीक, रब्बी हंगामातील हरभरा, गहू ही पीकेदेखील बाधित झाले आहेत. या अस्मानी संकटामुळे बळीराजाचे पूर्णपणे कंबरडे मोडले असून बाधित पिकांचा पंचनामा करून भरपाई द्यावी या मागणीसाठी आमदार दिलीप बोरसे यांनी मंगळवारी (दि. १५) कृषी मंत्री दादा भुसे यांची भेट घेऊन त्यांना साकडे घातले. त्याची दखल घेत भुसे यांनी बाधित पिकांचे तत्काळ पंचनामे करुन नुकसानीचा अहवाल सादर करण्याचे आदेश यंत्रणेला दिले. नुकसानीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर तो भरपाईसाठी शासनाकडे सादर करण्यात येईल असेही भुसे यांनी स्पष्ट केले.